हिंदी भाषेतील चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला मनसे चित्रपट सेनेचा विरोध आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा हिंदीत बनलेला चित्रपट मात्र जगभरातील भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्याची इच्छा मनसे चित्रपट सेनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे अभिनेता अजय देवगणने मनसेचे आभार मानत ‘तान्हाजी’ हा चित्रपट हिंदीसोबतच मराठीत डब करणार असल्याचे जाहीर केले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचं ट्विट रिट्विट करत अजयने आभार मानले.

“हिंदी व मराठी भाषेत आमचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेय आणि मनसेचे मी आभार मानतो. शूरवीर मराठा योद्धाची यशोगाथा त्यांच्या मातृभाषेत त्याचसोबत राष्ट्रीय भाषेत प्रेक्षकांना दाखवणे हा आमचा सन्मान आहे”, असं ट्विट अजयने केलं.

हिंदी चित्रपट मराठीमध्ये डब करण्यासाठी मनसे चित्रपट सेनेचा विरोध असतो. त्यामुळे यावेळी त्यांची नेमकी भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तान्हाजी यांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ मराठीत डब व्हावा असं मनसेनं सांगितलं आहे.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे. यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांसोबतच बरेच कलाकार भूमिका साकारत आहेत.