Aadesh Bandekar Reaction on Thackeray Reunion : शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी विषय लागू करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध झाला. पहिलीपासूनच्या हिंदी भाषा सक्तीला राजकीय वर्तुळातूनच नव्हे; तर मनोरंजन क्षेत्रातूनही जोरदार अनेकांनी विरोध दर्शवला होता. या विरोधानंतर राज्य सरकारने हिंदी भाषा अनिवार्यचा जीआर रद्द करत यावर पुर्नविचार करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
जीआर रद्द झाल्यानंतर ५ जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत वरळीमध्ये विजयी मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. या मेळाव्यात ठाकरे बंधूंना एकत्र पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावर एकत्र पाहून केवळ राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे तर मराठी मनोरंजन विश्वातीलही अनेकांनी पोस्ट शेअर केल्या होत्या. अशातच आता आदेश बांदेकर यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र आल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आदेश बांदेकर इन्स्टाग्राम पोस्ट
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल आदेश बांदेकरांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं, “आम्ही दिवसभर वारी करत होतो. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री एक-दीड वाजेपर्यंत आम्ही वारीत असायचो. वारीत बऱ्याच ठिकाणी रेंज नव्हती. तेव्हा आम्ही एका क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण म्हणजे सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचा. तो योग इतका चांगला होता की, आम्ही सगळेच वारकरी त्याची वाट पाहत होतो.”
यापुढे त्यांनी सांगितलं, “सोपान महाराजांची पालखी थांबलेली असते. मग संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि तिथे त्या दोन बंधूंची भेट होते. त्यानंतर सोपानदेव महाराजांकडून एक श्रीफळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथावर दिलं जातं. ती बंधूभेट होते, तेव्हा तो टाळ मृदुंगाचा जयघोष, आनंद आणि जल्लोष मी अनुभवला.”
यापुढे ते म्हणाले. “कोणत्याही कुटुंबातली बंधूभेट ही व्हायलाच पाहिजे आणि दोन भावांच्या भेटीचं अलौकिक प्रेम मी तिथे अनुभवलं. तिथे ती भेट झाली आणि इकडे ठाकरे बंधूंची भेट झाली. या योग्य आहे, हा संकेत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं ज्यासाठी होत होतं ते ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठी. त्याच ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर आम्ही चालत होतो. अजून काय हवं.”