Aai Kuthe Kay Karte Fame Actor Niranjan Kulkarni Wedding : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले होते. ‘आई कुठे काय करते’मध्ये अभिषेक देशमुख या अरुंधतीच्या मोठ्या मुलाची भूमिका अभिनेता निरंजन कुलकर्णीने साकारली होती. निरंजन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बिझनेसमुळे चर्चेत होता. त्याने ठाण्यात स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. आता अभिनेत्याने त्याच्या सर्व चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे.
निरंजन कुलकर्णी लग्नबंधनात अडकला आहे. इन्स्टाग्रामवर ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुंदर सजावट, समुद्रकिनारा अशा रम्य ठिकाणी अभिनेत्याचा लग्नसोहळा पार पडला आहे. निरंजन व त्याची पत्नी या व्हिडीओमध्ये एकमेकांना वरमाला घालताना दिसतात. यानंतर उपस्थित पाहुणेमंडळींनी या जोडप्यावर फुलांचा वर्षाव केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
निरंजन कुलकर्णीने, “आमच्या प्रेमाची नवी सुरुवात” असं कॅप्शन देत ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅप्शनच्या खाली अभिनेत्याने “लग्न, रिसेप्शन, डेस्टिनेशन वेडिंग, वेडिंग सेलिब्रेशन” असे हॅशटॅग वापरले आहेत.
निरंजन कुलकर्णीच्या पत्नीचं नाव मनीषा गुरम असं आहे. मनीषा ही न्यूट्रिशनिस्ट व लाइफस्टाइल एक्सपर्ट म्हणून काम करते असं तिने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केलं आहे. लग्नसोहळ्यातील रिसेप्शनला निरंजन व त्याच्या पत्नीने इंडोवेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. निरंजनने काळ्या रंगाचा सूट तर, त्याच्या पत्नीने डिझायनर गाऊन घातला होता. अभिनेत्याने शेअर केलेला त्याच्या लग्नातील हा सिनेमॅटिक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
याशिवाय निरंजनवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अक्षया नाईक, दिपाली पानसरे, अथर्व कर्वे या कलाकारांनी अभिनेत्याचं कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनंदन केलं आहे.