Aai Kuthe Kay Karte Fame Ashvini Mahangade Shared A Post : आपल्यातील प्रत्येकासाठी आपलं गाव, तिथलं घर, तिथली माणसं या सगळ्या गोष्टी खूप प्रिय असतात. त्यामुळे शहरात राहणारे अनेक जण वेळ मिळेल तसं गावी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात जवळच्या माणसांबरोबर वेळ घालवतात. कलाकारही याला अपवाद नाहीत. काही कलाकार मंडळीदेखील अनेकदा शूटिंगमधून वेळ काढत, गावी जाऊन जवळच्या माणसांबरोबर वेळ व्यतीत करताना दिसतात.

अनेकदा ते तेथील फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करीत असतात. अशातच आता ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत वडिलांची आठवणही सांगितली आहे. या पोस्टला तिने छान कॅप्शनही दिली आहे.

अश्विनी महांगडेने सांगितली वडिलांची ‘ती’ आठवण

अश्विनी कॅप्शन देत म्हणाली, “नानांनी खूप प्रेमाने बंगला बांधला आणि सगळ्यात मागे एक खोली काढली ती चुलीसाठी… बऱ्याचदा आम्ही जेवायला इथेच बसतो. पण मला वाटतं की, आमच्या यात्रेला या खोलीचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. हा फोटो मला फार आवडला.कारण- घरात मी मोठी असल्या कारणाने मी भाकरी करीत आहे आणि माझी दोन्ही लहान भावंडं म्हणजे मृण्मयी महांगडे आमच्या वकिलीणबाई व बद्रीशेट महांगडे उद्योजक जेवणाचा आनंद घेत आहेत… सोबत आमचा राया आहे.”

अश्विनी पुढे म्हणाली, “स्वराज्य, असं आमच्या घराचं नाव देताना नानांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आणि ते स्वराज्य वाढवण्याची, टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतोय.” अश्विनी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या गावाकडच्या आठवणी सांगत असते. तसेच ती अनेकादा तेथील तिचे फोटो व व्हिडीओही पोस्ट करीत असते. सध्या ती शूटिंगमधून ब्रेक घेत, गावी जाऊन भावंडांबरोबर छान वेळ व्यतीत करीत असल्याचं तिनं शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतं.

दरम्यान, अलीकडेच अश्विनी महांगडेची ‘स्टार प्रवाह’वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत एन्ट्री झाली. यापूर्वी ती याच वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेली. त्यामध्ये तिने अनघा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेतीली तिच्या भूमिकेतून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली.