‘आई कुठे काय करते’ या मालिकेने छोट्या पडद्यावर तब्बल ४ वर्षे अधिराज्य गाजवून प्रेक्षकांचा निरोप घेतला. दोन महिन्यांपूर्वीच ही मालिका संपली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेची मुख्य नायिका अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत झळकली होती. आता मधुराणी पाठोपाठ आणखी एक खास व्यक्ती ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेणार आहे.

‘स्टार प्रवाह’च्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, विशेषत: मालिकेतल्या खलनायकांनी सुद्धा प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या मालिकेतील लोकप्रिय आणि सतत अरुंधतीला त्रास देणारं पात्र म्हणजेच अनिरुद्ध देशमुख. अभिनेते मिलिंद गवळी ही भूमिका साकारत होते.

आता मालिका संपल्यावर अनिरुद्ध पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ते एन्ट्री घेणार आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत माजी समाजकल्याण मंत्री यशवंतराव भोसलेंची भूमिका ते साकारणार आहेत. मालिकेत सध्या पार्थ-नंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या धामधुमीत यशवंतराव भोंसलेंच्या एन्ट्रीने कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गवळी म्हणाले, “जवळपास तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय. अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. आजही प्रेक्षक या पात्राला विसरलेले नाहीत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. माजी समाजकल्याण मंत्र्याची भूमिका मी साकारत आहे. यशवंतराव भोसलेच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो आहोत. कॉलेजपासूनची ही मैत्री आजपर्यंत घट्ट आहे. जवळच्या मित्राच्या मालिकेत ही खास भूमिका साकारायला मिळतेय याचा आनंद वेगळा आहे. याशिवाय ‘स्टार प्रवाह’बरोबर एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे ही भूमिका खूपच स्पेशल आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सायंकाळी ७.०० वाजता प्रसारित केली जाते.