Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्धचा कधी कधी प्रेक्षकांना राग यायचा. पण ही मिलिंद गवळी यांच्या अभिनयाची ताकद आहे. मालिकेत खलनायकाची भूमिका करणारे मिलिंद गवळी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र तितकेच मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. सोशल मीडियावर ते कायमच सक्रीय असतात आणि आपल्या चाहत्यांबरोबर दैनंदिन जीवनातील अपडेट्स शेअर करत असतात.
अशातच मिलिंद गवळी यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शिर्डीमधील साई बाबांच्या दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी शिर्डीमधील एका हॉटेलमध्ये आरती केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्यांनी चाहत्यांच्या भेटीचीसुद्धा काही क्षण शेअर केले आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत मिलिंद गवळी असं म्हणतात, “मी माझ्या लहानपणापासून हे ऐकत आलो आहे की, शिर्डीच्या साईबाबाचं बोलावणं येतं. आजीकडून व आईकडून मला हेच ऐकायला मिळालं आहे. ‘मी नवसाचा आहे, माझ्यासाठी आईने साईबाबांकडे नवस केला होता. अनेक वेळेला शिर्डीला गेलो. एकदा मी असं ठरवलं. माझं काम हीच माझी पूजा आहे. मी कुठल्याच देवळात जाणार नाही. मी माझं काम प्रामाणिक करत राहणार. तेव्हाच मला एका मालिकेसाठी विचारण्यात आलं आणि ती मालिका होती शिर्डीच्या साईबाबांची.”
यानंतर ते म्हणतात, “मला बायजाबाईचा मुलगा ‘तात्या कोतें’ची भूमिका मिळाली आली. शिर्डीपासून दोन किलोमीटर अंतरावर एका शेतामध्ये संपूर्ण द्वारकामाईचा सेट लावला होता. अर्थातच साईबाबांची भूमिका सुधीर दळवीच करत होते. तेव्हा पण माझ्या मनात आलं की, बाबांनी मला शिर्डीला बोलावून घेतलं आहे. मी चालत साईबाबांच्या मंदिरात जायचो. मालिका बनवणारे लोक श्रद्धाळू किंवा बाबांचे भक्त नव्हते. दिवसाचं शूटिंग संपवून नित्यनियमाने दारू प्यायला बसायचे. मला ही गोष्ट खूप खटकत होती.”
मिलिंद गवळी इन्स्टाग्राम व्हिडीओ
यानंतर त्यांनी सांगितलं, “सात-आठ दिवसांचं शूटिंग झाल्यानंतर पाऊस-वारा-वादळ आलं आणि तो शेतातला द्वारकामाईचा संपूर्ण सेट उध्वस्त झाला. ती मालिका बंदच पडली. गेल्या आठवड्यापासून काही ना काही निमित्ताने बाबांचा विषय निघत होता. शिर्डीतल्या एका परिचयांचा फोन आला आणि त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिर्डीला या असं सांगितलं. एक बातमी वाचली, समृद्धी महामार्गाने शिर्डीला अगदी अडीच-तीन तासांमध्ये पोहोचतो. मनात आलं हे बाबांचं बोलवणं आहे.”
यानंतर ते म्हणतात, “माझ्या नवीन हिंदी मालिकेचं शूटिंग तीन-चार दिवस नव्हतं. आषाढी एकादशीसुद्धा होती. त्यात पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं. मग शिर्डीला जाऊयात असं वाटलं. त्यामुळे दीपाला म्हटलं, “सुट्टी आहे शिर्डीला जाऊया का?” ती एका पायावर तयार झाली. सकाळी गाडी काढली आणि समृद्धी महामार्गाने शिर्डीला कधी पोहोचलो कळलंसुद्धा नाही. शिर्डीत इडली-वड्याचा नाश्ता करायला स्वामी मद्रासला गेलो; तर तिथे हॉटेलचे मालक विश्वनाथ (बाबा) अय्यर भेटले (८० वर्षाचे अतिशय गोड प्रेमळ गृहस्थ) म्हणाले, “आषाढी एकादशीच्या चांगल्या दिवशी आला आहात, मंदिरात धूप आरती करा. बाबांच्या दरबारात, बाबांच्या अगदी समोर उभं राहून ४५ मिनिटं धुप आरती केली. आषाढी असल्यामुळे पांडुरंगाची पण पूजा झाली.”
यानंतर मिलिंद गवळी सांगतात, “खूप गोड आणि सज्जन माणसांच्या भेटीगाठी झाल्या. बाबा अय्यर, त्यांचा चिरंजीव प्रसाद, बजरंगी, इन्स्पेक्टर महेश, मंदिरातले पुजारी, कर्मचारी आणि असंख्य मालिका बघणारे गोड प्रेक्षक. असंख्य लोकांचे प्रेम, गोड आठवणी आणि साईबाबांचा आशीर्वाद घेऊन, माझ्या नवीन कामासाठी भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही दोघं परत घरी पोहोचलो.” दरम्यान, मिलिंद गवळींनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.