मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका देशपांडे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे राधिका घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावर राधिका मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करीत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. राधिकाने शरद पोक्षें यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारली होती. दरम्यान, राधिकाची नवी पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आज वीर सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे. त्यानिमित्त राधिकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. राधिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीचा एक फोटो शेअर केला आहे. मूर्तीमागे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकातील तिच्या व शरद पोक्षेंच्या सीनचा फोटो ठेवण्यात आला आहे. हा फोटो शेअर करीत राधिकाने लिहिले, “दोन वर्षांपूर्वी ही मूर्ती माझ्या घरी आली. कुठलीही गोष्ट मूर्त अथवा अमूर्त स्वरूपात आपल्या घरी येते तेव्हा त्याच्यामागे काही कारण असतं. कारण- जगातली कुठलीच गोष्ट निव्वळ योगायोग म्हणून घडत नसते. वीर सावरकर एक विचार आहे आणि तो घराघरांत पोहोचतो आहे.”

राधिकाने पुढे लिहिले, “सावरकर म्हणजे एक तप, एक व्रत, एक ज्योत. वीर सावरकरांची मूर्ती मी माझ्या अभ्यासाच्या खोलीत ठेवली आहे. तुमच्या घरी त्यांची मूर्ती कुठे ठेवली आहे?” राधिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा- तितीक्षा तावडेच्या लग्नासाठी निघाल्या ऑनस्क्रीन सासूबाई, ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पोक्षेंचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक खूपच गाजले. या नाटकाला प्रेक्षकांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सहा वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग थांबविण्यात आले होते. परंतु, खास प्रेक्षकांच्या आग्रहाखातर काही महिन्यांपूर्वी या नाटकाचे शेवटचे खास ५० प्रयोग आयोजित करण्यात आले होते. २६ जानेवारी २०२४ ला या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला.