Aai kuthe Kay Karte Fame Sumant Thakre shared A Post : आपल्याकडे देशभरात विशेषकरून महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन होतं. बऱ्याच मराठी कलाकारांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्यानेही त्याच्या घरच्या बाप्पाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता सुमंत ठाकरेने गणेशोत्सवनिमित्त त्याच्या घरातील बाप्पाबरोबरचे फोटो पोस्ट करीत बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून म्हटलंय, “जर कुणी मला विचारलं किंवा नाही जरी विचारलं की, कुठला दिवस पुन्हा जगायला आवडेल? तर माझं उत्तर हेच असेल की, माझ्या बालपणातील गणेशोत्सवाचे १० दिवस.”
पुढे तो म्हणाला, “धर्म, आपण आणि इतर, कोण श्रेष्ठ, यापलीकडे असलेल्या निरागसतेचे, कल्पनाशक्तीला खतपाणी घालणारे, कलेची लागवड करणारे, शांततेचे, समृद्धीचे आणि प्रेमाचे दिवस होते ते. गणपती आगमनाच्या आधीची लगबग, मंडळाची कामे, देखावा कसा भारी दिसेल यासाठी शक्कल लढवणे, घरच्या गणपतीची तयारी, रंगकाम, साफसफाई, मिरवणूक, भेटीगाठी, आरत्या, धुपाचे वास, प्रसाद, वेगवेगळ्या स्पर्धा, गाणी (DJ वर नव्हे), नृत्य, स्पर्धा, बक्षिसं आणि हे सगळं होऊन मग निरोप.”
सुमंत बालपणीची आठवण सांगत पुढे म्हणाला, “पुन्हा कधी येतील का असे दिवस माहीत नाही; पण त्या आशेत आणि आपल्याला कळत गेलेली प्रश्नांची उत्तरं पुढच्या पिढीला सांगत, त्यांच्या बालपणीच्या आठवणी स्वच्छंदपणे तयार करत, आपलं बालपण पुन्हा जगून घेऊ, गणेशोत्सव साजरा करीत राहू!!”
गणेशोत्सव हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. गणेशोत्सवात सगळे एकत्र येऊन बाप्पाची भक्ती करीत आनंद साजरा करताना दिसतात. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार यानिमित्त एकमेकांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेलेले त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळालं.
दरम्यान, सुमंत ठाकरेबद्दल बोलायचं झाल तर, तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे. त्यामध्ये त्याने अरुंधतीच्या जावयाची म्हणजेच अनिशची भूमिता साकारलेली. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.