Aastad Kale Traffic Post : काही दिवसांपासून घोडबंदर रोड हा सातत्यानं चर्चेत आहे. वाहतूक कोंडी, हे या चर्चेमागील कारण आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवासी, चालकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी होत आहे.
अनेक सामान्य नागरिकांप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारसुद्धा या मार्गावरील खड्ड्यांबाबत आपल्या सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता आस्ताद काळे. आस्तादनं याआधीही अनेकदा ठाणे-घोडबंदर मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबतच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.
अशातच आता आस्तादनं पुन्हा एकदा घोडबंदर मार्गावरील खड्ड्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं गूगल मॅपचा फोटो शेअर करीत अवघ्या काही अंतरासाठी खूप वेळ प्रवास करावा लागत असल्याचं म्हटलंय.
या पोस्टनुसार आस्तादला ठाण्यावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करताना घोडबंदर या ठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे २४ किलोमीटर अंतरासाठी जवळपास दोन तास इतका वेळ लागला असल्याचं पाहायला मिळत आहे. याच प्रवासाचा गूगल मॅप शेअर करीत त्यानं, “हा जो ४३ मिनिटांचा खोळंबा दिसतोय, तो एका खड्ड्यामुळे आहे बरं, जो नऊ दिवसांपूर्वी पडलाय. रविवारी दुपारी ४.३० वाजताही २४ किमी अंतराला एक तास ५४ मिनिटं लागली”, असं म्हटलंय
या पोस्टसह त्यानं कॅप्शनमध्ये असं म्हटलंय की, एकनाथ शिंदेकाका, देवेंद्र फडणवीसकाका, प्रताप सरनाईककाका, अजित पवारकाका, यशवंत चव्हाणकाका, नारायण राणेकाका, शरद पवारआजोबा… आणि अशाच माझ्या कळत्या वयात मी पाहत आलेल्या सर्व मंत्री काका, काकू, आजी आणि आजोबांनो… तुम्हा सर्वांना सा.न.वि.वि. (उद्धवकाकांना टॅग करता येत नाहीये) या महाराष्ट्राच्या अगणित नागरिकांच्या वतीनी मी तुमचे आभार मानतो.
पुढे तो असं म्हणतो, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या महाराष्ट्राचं गौरवस्थान, अभिमानबिंदू. त्यांना त्यांच्या रयतेची किती काळजी होती हे आम्ही जाणतोच. पुन्हा असा राजा होणं नाही. हा आमचा विश्वास तुम्ही सर्वांनी आजवरच्या तुमच्या कारकिर्दीतून अजून अजून दृढ बनवत नेलात, त्यासाठी आभारी आहोत. कळावे, लोभ असावा, एक महाराष्ट्रीय, भारतीय करदाता नागरिक.”
आस्ताद काळे इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, खड्ड्यामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि त्यासाठी लागलेला वेळ याबद्दल आस्तादनं पोस्ट शेअर करीत त्याचं म्हणणं अगदी शांतपणे मांडलं आहे. त्यानं शेअर केलेल्या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेक नागरिकांनीसुद्धा त्यांच्या वाहतूक कोंडीच्या समस्या व्यक्त केल्या आहेत.