‘आता होऊ दे धिंगाणा'(Aata Hou De Dhingana) हा शो प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतो. सिद्धार्थ जाधव या शोचे सूत्रसंचालन करीत असल्याचे पाहायला मिळते. स्टार प्रवाह वाहिनीवरील विविध मालिकांतील कलाकार या शोमध्ये सहभागी होतात. बहुतांश वेळा दोन मालिकांतील कलाकार एकमेकांविरोधात खेळत असतात. त्यांना काही टास्क दिले जातात. या टास्कदरम्यान गमतीजमती होतानाही दिसतात. एका टीमला पैसे जिंकण्याची संधीही मिळते. वेगवेगळ्या रकमा असलेल्या पेट्या ठेवलेल्या असतात. टीममधील एका सदस्याला तिथे जाऊन एक पेटी निवडायची असते. तो जी पेटी निवडेल, ती रक्कम त्या टीमची होते, असा हा खेळ आहे. याच खेळात साडे माडे शिंतोडे हा टास्कही सहभागी कलाकारांना पूर्ण करावा लागतो. त्यामध्ये सहभागी कलाकारांना गाण्यातील रिकाम्या जागा भरत गाणे म्हणायचे असते. आता मात्र या शोमध्ये एक ट्विस्ट असणार असल्याचे समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘आता होऊ दे धिंगाणा’चा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, ‘उदे गं अंबे’ मालिकेची टीम या या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. दुसऱ्या बाजूला अशोक शिंदे, अभिजीत खांडेकर, पंढरीनाथ कांबळे, मंदार जाधव, सुनील बर्वे हे लोकप्रिय कलाकार आहेत. या दोन टीम एकमेकांविरोधात खेळत असल्याचे दिसत आहे. सिद्धार्थ जाधव घोषणा करीत म्हणतो की, धिंगाणाच्या मंचावर तीन वर्षांत पहिल्यांदा घडतंय. या सहा पेट्यांमध्ये कुठल्या तरी एका पेटीत एक आकडा आहे. बाकी सगळ्या पेटीत शून्य आहे. त्यानंतर मंदार म्हणतो, “आमची इच्छा आहे की, यांनी एक लाख रुपये जिंकावेत.” त्यानंतर ‘उदे गं अंबे’मधील साक्षी महाजन टीममधील इतर कलाकारांना म्हणते की दृष्ट काढ. त्यावर सगळे हसताना दिसत आहेत.

‘उदे गं अंबे’ मालिकेतील कलाकार घंटाघरमध्ये जाऊन पेट्या अदलाबदल करीत एक लाख हा आकडा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर ते पेट्या उघडून दाखवतात. तर एक आकडा सुरुवातीला न आल्यामुळे ‘उदे गं अंबे’ची टीम एक रुपया जिंकते. प्रोमोच्या शेवटी पाहायला मिळते की, सिद्धार्थ जाधव त्यांना एक रुपयाचा चेक व एक रुपयाचे नाणे देत म्हणतो की हा इतिहास आहे. आतापर्यंत एक रुपया कोणीच जिंकला नव्हता. त्यानंतर सगळे हसताना दिसत आहेत.

हा प्रोमो शेअर करताना ‘धिंगणाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रम प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करताना दिसतोय. या कार्यक्रमात विविध मालिकांतील कलाकार एकमेकांसमोर येऊन खेळतात. त्यांच्यामध्ये टास्क होतात. काही मजेशीर किस्सेदेखील घडताना दिसतात. मालिकेशिवाय कलाकारांना वेगळ्या भूमिकेत, रूपात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यामुळे एक रुपया जिंकल्यानंतर ‘उदे गं अंबे’ टीमची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.