Abhidnya Bhave talks Mayuri Deshmukh : मराठी मालिकाविश्वात अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी आजही त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करुन आहेत. याचंच एक उदाहारण म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका. यामधून अभिनेत्री मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे व ओमप्रकाश शिंदे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. परंतु, या मालिकेच्या सेटवर मयुरी व अभिज्ञा एकमेकींसह फार बोलायच्या नाहीत.

अभिज्ञाने याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. अभिज्ञा, मयुरी व ओमप्रकाश यांनी काही दिवसांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी मालिकेच्या सेटवरील अनेक आठवणी सांगितल्या आहेत. यादरम्यान अभिज्ञाने तिच्या मयुरीबरोबरच्या मालिकेच्या सेटवरील बाँडबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “आमच्यामध्ये सेटवर कधी भांडणं झालेली मला तरी आठवत नाही, कारण मी आणि मयुरी तेव्हा एकमेकींबरोबर फार बोलायचो नाही.”

अभिज्ञा पुढे म्हणाली, “आम्ही मेकअप रुममध्ये एकत्र असायचो तेव्हासुद्धा आमच्यामध्ये फार बोलणं व्हायचं नाही. मयुरी खूप शांत आणि ठराविक लोकांशी बोलणारी व्यक्ती होती आणि तेव्हा मी तशी नव्हते. पण, मला असं वाटतं हे असंच होणं अपेक्षित आहे आणि हे असंच असलं पाहिजे. हे एकमेव असं प्रोजेक्ट आहे, जिकडे आम्ही त्या प्रोजेक्टसाठी काम करत असताना आमच्यामध्ये जेवढी जवळीक नव्हती तेवढी आता आहे.”

अभज्ञा पुढे याबाबत म्हणाली, “त्याचं कारण फक्त एवढंच आहे की, मला असं वाटतं आमचं नातं खूप नैसर्गिकरित्या निर्माण झालं आणि ते होण्यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी मध्ये गेला. आम्ही सेटवर असतानाही मज्जा करायचो, पण ते फक्त सहकलाकार म्हणून असायचं, मात्र आता आम्ही एक कुटुंब म्हणून मज्जा करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘झी मराठी’वरील ‘तारिणी’ या मालिकेतून एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. ‘तारिणी’ मालिकेची निर्मिती अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व तिचा नवरा तेजस देसाईने केली आहे.