Marathi Actor Abhijeet Chavan Post : अलीकडच्या काळात युट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून अनेक खोट्या बातम्या पसरवल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची अफवा व्हायरल करण्यात आली होती. यामुळे चाहत्यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सगळ्या गोंधळानंतर मोहन जोशी यांनी स्वत: एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत ठणठणीत बरं असल्याचं सांगितलं होतं.

यानंतर असाच काहीसा अनुभव मराठी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आणखी एका अभिनेत्याला आला आहे. या अभिनेत्याने फेसबुक पोस्ट शेअर करत घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत, “आता काय करायचं यांचं?” असा सवाल उपस्थित केला आहे. या अभिनेत्याचं नाव आहे अभिजीत चव्हाण.

विविध मालिका व चित्रपटांच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून अभिजीत चव्हाणला ओळखलं जातं. इंडस्ट्रीतील बरेच कलाकार त्याला प्रेमाने ‘बाबा’ असंही म्हणतात. अभिजीतने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

एका युट्यूब चॅनेलने, “मराठी सिनेविश्वातील दोन कलाकार गमावले” असं युट्यूब थंबनेल बनवत यावर दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे आणि तिच्या बाजूला अभिजीत चव्हाण यांचे फोटो वापरले आहेत. थंबनेलवर क्लिकबेट देऊन प्रत्यक्षात व्हिडीओमध्ये आशिष वारंग यांच्या निधनाची बातमी सांगण्यात आली आहे. ही अशाप्रकारची नेटकऱ्यांची खोटी आणि चाहत्यांच्या भावनांशी खेळणारी कृती पाहून अभिजीतने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

“माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली… अजून काय पाहिजे…. आता काय करायचं यांचं? असा सवाल अभिजीतने त्याच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे. याशिवाय त्याच्या पोस्टवर असंख्य मराठी कलाकारांनी सुद्धा प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

“सोशल मीडियावर अफवा पसरवण्यापेक्षा जबाबदारीनं वागणं महत्त्वाचं आहे. एखाद्या जिवंत व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणं ही मोठी अमानुष कृती आहे.”, विशाखा सुभेदारने यावर कमेंट करत, “कारवाई करा.. आणि तुझं आयुष्य वाढलं बाबा..” असं म्हटलं आहे.

दरम्यान, अभिजीत चव्हाणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सध्या तो, ‘सुंदर मी होणार’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याशिवाय तो ‘मुरांबा’ मालिकेत सुद्धा झळकला होता.