Satvya Mulichi Satvi Mulgi Fame Actor’s New Hindi Serial : मराठीतील बरेच कलाकार हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात. अशातच आता अजून एका मराठमोळ्या अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलीगी’फेम अभिनेता लवकरच हिंदी मालिकेतून झळकणार आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबत माहिती दिली आहे. या मालिकेमध्ये केदार हे पात्र साकारणारा अभिनेता म्हणजेच अभिजीत केळकर लवकरच हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिजीतने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. तो ‘मनपसंद की शादी’ या मालिकेतून झळकणार आहे. अभिनेत्याने या पोस्टला ‘आमच्या नवीन हिंदी मालिकेचा पहिला प्रोमो; शुभेच्छा, आशीर्वाद असू द्या, गणपती बाप्पा मोरया’ अशी कॅप्शनही दिली आहे.

‘मनपसंद की शादी’ या मालिकेत अभिजीतसह इतर काही प्रसिद्ध मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी लागली आहे. या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, स्वाती देवल, इरावती लागू हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत. मिलिंद गवळी व सुचित्रा बांदेकर हे दोघे मालिकेतील नायिकेच्या आई-वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

अभिजीत केळकर व स्वाती देवल यामध्ये कोणत्या भूमिकेतून झळकणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. समोर आलेल्या प्रोमोमध्ये मिलिंद गवळी व सुचित्रा बांदेकर यांच्यासह स्वाती देवलही पाहायला मिळत आहे. ‘मनपसंद की शादी’ ही मालिका ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कलर्स वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीत केळकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने आजवर अनेक मालिका, चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकताच तो ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून झळकला होता. त्यातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यापूर्वी अभिजीतने ‘पुढचं पाऊल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तुझं माझं जमेना’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘बालगंधर्व’, ‘तिचा बाप त्याचा बाप’ यांसारख्या मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे.