Abhijeet Khandkekar On late actress Priya Marathe: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे ३१ ऑगस्टला कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनानंतर मनोरंजनक्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तसेच, अनेकांनी तिच्या आठवणीदेखील सांगितल्या.

आता अभिनेता अभिजीत खांडकेकरने एका मुलाखतीत प्रियाच्या आठवणी सांगितल्या. प्रिया व अभिजीत यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. अभिजीतने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली.

या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रियाबद्दल असं कधी बोलावं लागेल, असं कधी डोक्यातही नव्हतं. गेल्या दीड वर्षांमध्ये हा आजार तिला जडला. खरं सांगायचं तर तिच्या घरच्यांबरोबरच म्हणजे शंतनूनंतर फार मोजक्या लोकांना ही माहिती होती. त्यातला मी एक होतो. कारण- आम्ही रोजचं काम एकत्र करायचो. इतके चांगले मित्र होतो. पण, इतक्या लवकर गोष्टी ढासळत जातील, तिची तब्येत ढासळत जाईल आणि अशी एखादी बातमी येईल, याची कल्पना असूनही आपलं मन सतत नाही म्हणत असतं. तशी काहीतरी परिस्थिती होती.”

“मी मागे लागून विनंती करत होतो की…”

“आताही कितीही म्हटलं तरी अजूनही खरं वाटत नाही. आजही सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज करायला जेव्हा जातो, तेव्हा मी प्रियाचं नाव टाइप करतो. ती जाण्याच्या आदल्या दिवशी मेसेज केला होता. त्याच्या काही दिवस आधी आमचं बोलणं झालं होतं. तेव्हाही ती कोणाला भेटायला तयार नव्हती. तिची इच्छा नव्हती.”

“तरीही मित्र हट्टीपणा करतो, तसं मी मागे लागून विनंती करत होतो की मी येतो. तू काही बोलू नकोस, मला एकदा येऊन भेटू दे. पण, शेवटी जे देवाच्या मनामध्ये जे असतं आणि आपण ते बदलू शकत नाही, असं मला वाटतं. त्यामुळे आता आपण हे मान्य करायला पाहिजे की ती आता आपल्यामध्ये नाही. आम्ही तिचे जवळचे सगळेच मित्र, शंतनू प्रयत्न करत आहोत.”

प्रियाच्या आठवणीविषयी अभिजीत म्हणाला, “‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान आम्ही जो वेळ एकत्र घालवला आहे. तर असं वाटतं की सेटवर दोन नाहीतर तीन लहान मुली होत्या. त्यात प्रिया एक होती. कारण- मुळातच प्रिया खूप निरागस होती. ती असती तर यावर हसली असती. दीड- पावणे दोन वर्षांच्या त्या काळात आमची खूप चांगली मैत्री झाली. त्या चॅनेलसाठी अनेक कार्यक्रम केले. “

“त्या निमित्ताने एकाच रस्त्यावरुन येणं-जाणं असल्याने गाडी शेअर करणं असेल, एकमेकांना सोडणं असेल, कुठेतरी खायला प्यायला म्हणून बाहेर जाणं असेल, एकत्र वेळ घालवणं असेल. आयुष्याबद्दल गप्पा मारणं असेल, फार गोष्टी आम्ही एकत्र केल्या. त्यामुळे आपल्या नजरेसमोर कोणाचं अशी तब्येत वगैरे ढासळत जाणं असेल, फार चटका लावून जाणारं आहे”, असे म्हणत अभिजीतने त्याच्या भावना व्यक्त केल्या.