आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका गायक म्हणजेच अभिजीत सावंत. फक्त संगीताची जादूच नाहीतर त्याने ‘बिग बॉस मराठी’सारख्या शोमधून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अतिशय संयमी खेळ खेळून तो या शोच्या महाअंतिम फेरीत पोहोचला होता.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा उपविजेता ठरलेला अभिजीत सावंत येत्या काळात कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक होते. अभिजीतचं नवीन गाणं केव्हा येणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अशातच अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्याने नव्या गाण्याचं प्रोस्टर प्रेक्षकांबरोबर शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे.
मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं ‘चाल तुरु तुरु’ हे गाणं अभिजीत सावंत एका नव्या अंदाजात सर्वांसमोर पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. ‘चाल तुरु तुरु’ या जुन्या गाण्याचं खास नवीन व्हर्जन अभिजीत सादर करणार आहे. येत्या २ मे २०२५ रोजी हे खास गाणं प्रदर्शित होणार असून मूळ गाण्यात हटके ट्विस्ट आणून हे गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिजीतचा मंत्रमुग्ध करणारा आवाज सर्वांनाच आवडतो. आता त्याचं हे नवीन गाणं बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चाहते देखील तितकेच उत्सुक आहेत यात शंका नाही.
२०२५ हे वर्ष अभिजीत सावंतसाठी अजून एका कारणाने खास ठरणार आहे. ते म्हणजे त्याचं संगीत विश्वातील हे विसावं वर्ष आहे. या निमित्ताने अभिजीतने ‘चाल तुरु तुरु’ हे गाणं प्रेक्षकांना भेट म्हणून दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रेक्षक कायम अभिजीतच्या नवनवीन कलाकृतीची वाट बघत असतात आणि अशातच हे नवं गाणं प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे.
या गाण्याचं पोस्ट शेअर करत अभिजीत लिहितो, “मे महिन्याच्या २ तारखेला गाणं येतंय आपण सगळेजण मिळून एकत्र या गाण्यावर Vibe क्रिएट करू” या गाण्यात निक शिंदे आणि सृष्टी आंबवले हे कलाकार सुद्धा झळकणार आहेत.
दरम्यान, या नव्या गाण्याची पहिली झलक पाहताच अभिजीत सावंतच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.