अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’मुळे पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आला. अभिजीतने त्याच्या सुरेल आवाजाने अनेकांची मनं जिंकली आहेत. ‘सर सुखाची श्रावणी’ या गाण्यानं तर त्यानं मराठी मनांना वेड लावून सोडलं. त्यानं गायलेलं हे गाणं त्याच्या गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे आणि आजही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. अभिजीत सावंतला मराठी प्रेक्षकांकडून कायमच भरभरून प्रतिसाद मिळत आला आहे. त्याबाबत स्वत: गायकानं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

अभिजीत सावंत यानं नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यानं मराठी प्रेक्षक, मराठी इंडस्ट्री याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याच मुलाखतीमध्ये त्यानं मराठी प्रेक्षकांनी आजपर्यंत माझ्यावर खूप प्रेम केल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला, “मराठी प्रेक्षकांनी मला हा आमचा मराठी मुलगा आहे, असं म्हणत कायम माझ्यावर प्रेम केलं आहे. पण, मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की, मराठी इंडस्ट्रीमध्ये मला अनोळखी असल्यासारखी वागणूक मिळाली. मराठी नसल्यासारखीच वागणूक दिली गेली आणि त्यामुळे मी खूप दुखावलो गेलो.”

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिजीत पुढे म्हणाला, “मराठी प्रेक्षकांनी जे प्रेम केलं, प्रतिसाद दिला, ते मला मराठी इंडस्ट्रीतून कधीच नाही मिळांलं. ‘बिग बॉस’मुळे मला पुन्हा मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं.” त्याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला, “एक असू शकतं की, माझा कल कायम हिंदीकडे जास्त राहिला. कारण- ‘इंडियन आयडॉल’ एक हिंदी कार्यक्रम होता. त्यामुळे मी अमराठी लोकांबरोबर जास्त काम केलं आहे. पण, मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला मुलगा आहे. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात माझं शिक्षण झालं. त्यामुळे मी पुढे जेव्हा बॉटनी करणार होतो तेव्हा तेही मराठीतूनच करणार होतो.”

“मी मराठी लोकांबरोबरच पहिला हिंदी चित्रपट केला होता. पण लोकांना माझ्याबद्दल भ्रम आहे की, हा हिंदीत काम करणारा मराठी मुलगा आहे.” अभिजीत सावंतने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. त्यामध्ये तो अंतिम फेरीतही पोहोचला होता. यादरम्यान त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, अभिजीत सावंतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ७ एप्रिल २००५ साली अभिजीत ‘इंडियन आयडॉल’चा विजेता झाला. तर त्याचं ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं त्या काळी प्रचंड गाजलं होतं आणि आजही या गाण्याचा चाहतावर्ग आहे. आजवर त्यानं ‘सर सुखाची श्रावणी’, ‘लाफझोन में’, ‘मोहब्बतें लुटाऊंगा’, ‘सौ तरह के’, ‘क्या तुझे पता है’, यांसारखी अनेक गाणी गायली आहेत.