Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचं विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना १२ जूनला घडली. विमानाने दुपारी उड्डाण घेतल्यावर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला. या विमान अपघातानंतर संपूर्ण देश हळहळला आहे. सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.
एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या AI 171 या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल होते. ते एअर इंडियामध्ये लाईन ट्रेनिंग कॅप्टन या पदावर कार्यरत होते. पवई येथील जलवायू विहार संकुलात ते आपल्या वडिलांसह राहत होते. कॅप्टन सभरवाल यांच्या वडिलांचं वय ८८ वर्षे आहे. त्यांच्याच इमारतीत हिंदी मालिकांमध्ये काम करणारा लोकप्रिय अभिनेता अजय सिंह चौधरी देखील वास्तव्यास आहे.
कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या अपघाती निधनानंतर अजयला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याने कॅप्टन सभरवाल यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
अजय सिंह चौधरी पोस्ट शेअर करत लिहितो, “खरंतर मी जे काही पाहिलं त्याचं जड अंत:करणाने वर्णन करणं देखील खूप कठीण आहे. माझ्याच इमारतीत राहणारे कॅप्टन सुमित सभरवाल आज आपल्यात नाहीत. मी त्यांना अनेकदा भेटलो होतो. नेहमी आनंदी असायचे, शांत स्वभाव, प्रचंड प्रेमळ आणि महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर कायम समाधानी भाव… अहमदाबाद विमान अपघातात त्यांचं निधन झालं आणि त्यांचं अचानक जाणं मनाला चटका लावून गेलं.”
“आज मी त्यांच्या घरी गेलो होतो… त्यांच्या ८८ वर्षांच्या वडिलांना भेटलो. त्या खोलीतील शांतता शब्दांपेक्षा खूप काही बोलून गेली. कोणत्याही पालकांना अशा वेदना सहन कराव्या लागू नयेत. त्यांचे वडील फक्त शांत बसून होते. सुमित प्रचंड हुशार वैमानिक होते. पण, त्यापेक्षा पुढे जाऊन ते आमच्यातील एक होते यामुळेच त्यांची अनुपस्थिती सतत जाणवत आहे… ओम शांती, कॅप्टन तुम्हाला कधीही विसरता येणार नाही…” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या AI 171 या विमानात १२ क्रू सदस्यांसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्यापैकी भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे एकमेव सुखरुप बचावले आहेत. तर, उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला आहे.