Gaurav More : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणजेच लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. यापूर्वी गौरवने अनेक कॉमेडी शोजमध्ये काम केलेलं आहे. अभिनेत्याने हास्यजत्रेसह ‘मॅडनेस मचाएंगे’ हा हिंदी शो सुद्धा गाजवला होता. याशिवाय अनेक मराठी सिनेमांमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांत गौरवने प्रचंड फॅनबेस कमावला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौरवने त्याचा इंडस्ट्रीतील प्रवास सांगितला. यावेळी अभिनेत्याने इंडस्ट्रीची दुसरी बाजू अधोरेखित करत, त्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे.
गौरव मोरे ‘महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मला इंडस्ट्रीत कुणाचीच साथ मिळाली नाही. मला तर बरेच जण बोलायचे, तू कसा इंडस्ट्रीत काम करतोस तेच बघतो. आताही अनेक लोक माझ्याबरोबर काम करत नाहीत, काही लोकांनी फोन करून सांगितलंय की याला काम देऊ नका. बरं…या सगळ्या घटना अलीकडेच घडलेल्या आहेत. त्यामुळे मला एकटं राहायला आवडतं. माझे दोन चांगले मित्र आहेत ते म्हणजे अभिनय बेर्डे आणि विशाल देवरुखकर त्यांच्या संपर्कात मी कायम असतो. पण, इतर बाकीच्या गोष्टींमध्ये मी फारसं लक्ष देत नाही. कारण, मला काम करायचंय… ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आज नवीन घर झालंय, त्याचा EMI आहे. पण, माझ्याबाबतीत लोक का असं करत आहेत मला माहिती नाही. या सगळ्यांना मी माझ्या कामातूनच उत्तरं देणार आहे.”
“मी नेहमी सगळ्यांना एवढंच सांगेन की कधी कोणाचं पोट नका मारू…मला माहितीये आजकाल स्पर्धेचं युग आहे पण ती स्पर्धा ‘हेल्दी’ असायला पाहिजे. माझ्याबरोबर कोण-कोण काय करतंय सगळ्यांना सगळं माहितीये…पण, अशा वागण्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती कायमचा गमावताय हे तुम्हाला लक्षात येत नाहीये.”
“मी एक मालिका करत होतो, तिथे फोन करून सांगण्यात आलं की, हा एकावेळी दोन-दोन शो करतोय त्यामुळे तुम्ही त्याला काम करू देऊ नका. त्याला थांबवा…पण, मी खरंच सांगेन अशा पद्धतीने कधीच कोणाचं पोट मारू नका. गौरवबरोबर राहू नका, बोलू नका, काम करू नका या अशा गोष्टी करणं बालपणी ठीक वाटायचं पण, आज तुम्ही मोठे आहात. तुम्ही तुमचे ग्रुपने राहा मला काहीच फरक पडणार नाही. मला फक्त या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणे काम करायचंय, सिनेमे करायचेत आणि मी तेच यापुढे करत राहीन” असं गौरवने यावेळी स्पष्ट केलं