अलीकडे छोट्या पडद्यावरही किसिंगचे सीन दाखवले जातात. अर्थात त्याचं प्रमाण कमी असतं. पण, असा एखादा सीन करताना कलाकारांना अवघडल्यासारखं वाटतं. सहकलाकाराबाबतीत ते असहज होतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? एका अभिनेत्याने मालिकेत किसिंग सीन करण्यासाठी बायकोबरोबरच सासूचीही परवानगी घेतली होती. कोण आहे हा अभिनेता?
अभिनेता रवी दुबेने मालिकेत किसिंग सीनसाठी त्याच्या सासूची परवानगी घेतली होती. रवी दुबे आणि त्याची पत्नी सरगुन मेहता हे टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडपं आहे. दोघांमधील प्रेम त्यांच्या चाहत्यांची कायमच मनं जिंकतात. विशेष म्हणजे हे दोघेही कोणताही नवा प्रोजेक्ट स्वीकारण्याआधी एकमेकांची परवानगी घेतात.
अशाच मालिकेतील एका किसिंग सीनसाठी रवीने त्याच्या बायको आणि सासूची परवानगी घेतली होती. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये त्याची पत्नी सरगुन मेहताने स्वतः ही माहिती सांगितली होती. याबद्दल तिने सांगितलेले की, एका मालिकेमध्ये किसिंग सीन करण्याआधी रवीने तिचीच नव्हे; तर तिच्या आई-वडिलांचीदेखील परवानगी घेतली होती.
यावेळी सरगुनने सांगितलेले की, “रवीने मला मालिकेत किसिंग सीन आहे हे सांगितलं. त्यावर मी त्याला ठीक आहे, काहीच हरकत नसल्याचे म्हटलं. त्यानंतर रवीने याबाबत माझ्या आई-बाबांशी चर्चा करायला हवी असं मला सांगितलं. मग मी त्याला आई-बाबांना याबाबत काहीही सांगण्याची आवश्यकता नाही, हा आपल्या कामाचा एक भाग आहे असं म्हटलं.”
रवी दुबे इन्स्टाग्राम पोस्ट
मात्र, किसिंग सीनसाठी आपल्या सासू-सासऱ्यांकडून परवानगी घ्यावी यावर रवी ठाम होता असेही तिने म्हटले. याबद्दल तिने पुढे सांगितलं, “रवी मला म्हणाला की नाही, मला तुझ्या आई-बाबांची परवानगी घ्यावी लागेल, ते गरजेचं आहे. त्यानंतर त्याने माझ्या आईला फोन केला आणि मालिकेतील या किसिंग सीनबद्दल सांगितलं. हे ऐकून आईलासुद्धा आधी थोडं अवघडल्यासारखं वाटलं.”
दरम्यान, ‘जमाई राजा’ या मालिकेचा सिक्वेल ‘जमाई राजा २.०’ मध्ये रवीने हा किसिंग सीन केला आहे. या मालिकेतील त्याची भूमिका एका आदर्श जावयाची होती. त्याच्या इतर कामाबद्दल बोलायचं झालं, तर ‘स्त्री… तेरी कहानी’, ‘सास बिना ससुराल’ आणि ‘जमाई राजा’ या मालिकांमध्ये तो झळकला आहे. अशातच तो बहुप्रतीक्षित ‘रामायण’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’मध्ये रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. ‘रामायण’ चित्रपटात रवी आधी असेल की नाही याबद्दल साशंकता होती. पण, ‘रामायण’च्या टीझरमध्ये रवी दुबेचं नाव पाहिल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाला. तसंच त्याने स्वत:ही या चित्रपटाचा टीझर शेअर करत आनंदी भावना व्यक्त केल्या होत्या.