Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचं नवीन पर्व येत्या २६ जुलैपासून ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू होणार आहे. छोट्या पडद्यावर जवळपास १० वर्षे अधिराज्य गाजवल्यावर गेल्यावर्षी मार्च २०२४ मध्ये ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, लवकरच हा शो नव्याने, एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं वाहिनीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ‘चला हवा येऊ द्या’चा नवा सीझन एका नव्या रुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळेल. यंदाच्या सीझनमध्ये शोमध्ये तीन नवीन चेहरे झळकणार आहेत. ते म्हणजे अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची जवळपास १० वर्षे धुरा सांभाळणारा डॉ. निलेश साबळे आणि अभिनेता भाऊ कदम हे दोघंही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने ते या पर्वात झळकणार नाहीयेत.
याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पोस्टमन काकांची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता सागर कारंडे नव्या पर्वात झळकणार की नाही? याबद्दल चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, अभिनेत्याने नुकत्याच ‘मराठी मूड’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. सागर कारंडे म्हणाला, “मी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आता नाहीये. खरंतर मी तो कार्यक्रम मध्यंतरी बंद झाला, त्याच्या २ वर्षांआधीच सोडला होता. मी तेव्हाच शो सोडला होता कारण… मला जरा वेगवेगळं काम करून पाहायचं होतं. त्यामुळे नव्या पर्वातही मी नसेन.”
काही महिन्यांपूर्वी सागर कारंडेने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत, “यापुढे स्त्री पात्र करणार नाही” असं जाहीर केलं होतं. सागरची ती पोस्ट पाहून त्याच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला होता.
दरम्यान, सागर कारंडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर तो सध्या सिनेमा व रंगभूमीकडे वळला आहे. ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे’ या संतोष पवार दिग्दर्शित नाटकात सागर कारंडे महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्याच्यासह या नाटकात शलाका पवार, विनिषा कुलकर्णी, हर्षदा कर्वे, संतोष पवार, राकेश शालिनी, प्रतिक पाध्ये हे कलाकार झळकत आहेत.