Marathi Actor Suyash Tilak Car Accident : ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे अभिनेता सुयश टिळक घराघरांत लोकप्रिय झाला. गेल्या काही महिन्यांपासून सुयश विविध पर्यटन स्थळांची भ्रमंती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तो सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो, त्याच्या प्रत्येक ट्रिपच्या अपडेट्स अभिनेता चाहत्यांसह शेअर करतो. मात्र, सुयशने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. प्रवासादरम्यान गाडीचा अपघात झाल्याची पोस्ट सुयशने नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

सुदैवाने या अपघातात अभिनेत्याला कोणतीही इजा किंवा दुखापत झालेली नाहीये. मात्र, यामध्ये त्याच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आणि गाडी बंद पडली. गाडी बंद झाल्याने अभिनेत्याला महामार्गावरून टो करून पुन्हा घरी परतावं लागलं. याचा अनुभव सुयशने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

सुयश टिळक काय म्हणाला?

सुयश टिळक लिहितो, “गाडी न चालवता सर्वात लांबचा प्रवास…एक छोटासा अपघात झाला…यात मला कोणतीही दुखापत झाली नाही पण, यामुळे माझ्या गाडीचं खूप नुकसान झालं. मला किंवा इतर कोणालाही दुखापत झाली नाही याबद्दल मनात कृतज्ञता आहेच पण, ज्याठिकाणी हे घडलं तिथे मला कोणतीही मदत मिळाली नाही. घरी जाण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे गाडी टो करणं. १ तास वाट पाहिल्यावर टोइंग व्हॅन आली. टो ड्रायव्हरने मला आत बसायला सांगितलं. त्यानंतर मी शांतपणे विनाएसीशिवाय कारमध्ये बसून राहिलो. जवळपास ६ ते ७ तास महामार्गावरून प्रवास केला. लोक कुतूहलाने माझ्याकडे डोकावून पाहत होते, काही माझ्या नशिबावर हसत होते, तर काही विचारत करत असतील याच्याबाबतीत नेमकं काय झालंय?”

“मी कदाचित रागावलो असतो, चिडू शकलो असतो पण, तुम्हाला आयुष्यात जे समोर येतं ते कायम स्वीकारावं लागतं. या टोइंगच्या प्रवासात पुस्तक वाचलं, गाणी ऐकली, झोप घेतली. कधीकधी तुम्हाला आवडो किंवा न आवडो आयुष्य तुम्हाला अशाचप्रकारे पुढे घेऊन जातं. आता हा प्रवास रागात, चिडचिड करून करायचा की खिडकी उघडून मोकळा श्वास घेत आनंदाने प्रवास करायचा हे आपल्या हातात असतं.” असं सुयशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सुयश टिळकच्या या पोस्टवर श्रुतकीर्ती सावंत, सुकन्या मोने, अनुपम ठोंबरे, उदय टिकेकर शिल्पा तुळसकर या कलाकारांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी सुद्धा कमेंट्स करत सुयशला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.