गेले काही दिवस राज्यभरात हिंदी-मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिली पासूनच्या हिंदी सक्तीमुळे हा विषय चर्चेत आला. पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीला अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर शासनाने जीआरही रद्द केले. हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही जीआर रद्द झाल्यानंतरही मराठी भाषेचा विषय अजून संपलेला नाही. अनेक ठिकाणी मराठी बोलण्याचा आग्रह केला जात आहे. मराठी बोलण्यावरून काहीजण प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत.

सोशल मीडियावर मराठी माणसांकडून अमराठी माणसाला मारहाण केली जात असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे मराठी माणसाबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. या गैरसमजाबद्दल लोकप्रिय मराठी अभिनेत्याने व्हिडीओ शेअर केला आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम स्वप्नील राजशेखर यांनी मराठी-हिंदीच्या वादावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ हिंदी भाषेत आहे.

या व्हिडीओत ते असं म्हणतात, “आम्ही मराठी लोक… मग तो सामान्य मराठी माणूस असो किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा एखादा छोटा-मोठा नेता असो. तो कायम ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ म्हणतो. आजपर्यंत कोणीच ‘जय महाराष्ट्र’ आधी आणि नंतर ‘जय हिंद’ असं म्हटलेलं नाही. आपल्या भारतीय सैन्याच पाहा ना… भारतातल्या प्रत्येक भागातून आणि महाराष्ट्रातूनही अनेक तरुण सैन्यात भरती होत आहेत. देशासाठी आपलं बलिदान देतात.”

स्वप्नील राजशेखर इन्स्टाग्राम व्हिडीओ

यापुढे ते म्हणतात, “मराठी मानसिकता जर संकुचित असती; तर इतक्या वर्षांपासून जे लोक इथे राहत आहेत, जे अमराठी लोक महाराष्ट्रात राहत आहेत, जे मराठी लोकांबरोबर चांगली मराठी भाषा बोलतात आणि इथली संस्कृती जाणतात, तसंच जे इथे राहून आपला उदरनिर्वाह करतात ते हे सगळं करू शकले असते का? आज भाषेमुळे जे वातावरण बिघडलं आहे, त्याचं काहीतरी कारण आहे. उगाच मराठी माणूस संवेदनशील झाला नाही.”

यानंतर ते म्हणतात, “मराठी मानसिकता अजिबात संकुचित नाही. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेसाठी योगदान दिलं आहे, त्यांनी मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड असल्याचं वर्णन केलं आहे. आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. आज जे लोकशाही आणि संविधानाबद्दल बोलत आहेत, ते संविधान एका मराठी माणसानेच म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी आपल्याला दिलं आहे. हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा जबरदस्ती हासुद्धा कुठल्या प्रश्नावरील पर्याय नाही हे आम्हीही मान्य करतो.”

यापुढे ते असं म्हणतात, “जर एखादा मराठी माणूस तुम्हाला मराठी बोलण्यासाठी आग्रह करेल, तर तुम्ही त्याला ‘मला मराठी येत नाही; पण मी शिकण्याचा प्रयत्न करेन, जय महाराष्ट्र’ असं प्रेमाने सांगू शकता. तोडक्या मोडक्या मराठीत तुम्ही दोन वाक्य बोललात; तरी जो तुमचा गळा पकडायला आला आहे, तो तुमची गळाभेट घेईल. मी भारतातल्या कोणत्याही प्रदेशात जातो, तेव्हा मी तिथली भाषा आणि संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मला तिथली भाषा बोलता येत नसेल; पण मी त्याचा आदर करतो. तुम्हीही असं प्रेमाने वागलात तर तो मुद्दा तिथंच संपेल.”

मराठी माणूस आणि महाराष्ट्राला बदनाम करत आहेत : स्वप्नील राजशेखर

यापुढे स्वप्नील राजशेखर असं म्हणतात, “हिंदी ही भाषा एखाद्या मराठी माणसाला शाळेत शिकवायची गरज नाही. हिंदी चित्रपटांनी ते काम केलं आहे. मी जे बोलत आहे; ते मी कुठल्या शाळेत शिकलेलो नाही. मी हे अनेक हिंदी चित्रपटांमधूनच शिकलो आहे. पण काही लोक मराठी भाषेचा या मुद्द्याला नीट समजून न घेता व्हिडीओ बनवत आहेत आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्राला बदनाम करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर ते असं म्हणतात की, “मराठी माणसाला देशभक्तीबद्दल सांगत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही उगाच ही गोष्ट बिघडवत आहात. पुन्हा एकदा सांगतो, मराठी माणसाला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. त्याच्या नसानसांत देशभक्ती आहे. आम्ही कायमच ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ म्हणत आलो आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र.”