Renee Cosmetics Owner Aashka Goradia : टीव्ही मालिकांमध्ये काम करून अनेक कलाकार लोकप्रिय झाले. स्मृती इराणी, राम कपूर, साक्षी तंवर, श्वेता तिवारी हे असेच काही यशस्वी टीव्ही कलाकार आहेत. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात केली होती. पण मग तिने अभिनय सोडून व्यवसाय करायचं ठरवलं आणि आता ती १२०० कोटी रुपयांच्या कंपनीची मालकीण आहे.
या अभिनेत्रीचं नाव आश्का गोराडिया. आश्काने २००२ मध्ये ‘अचानक 37 साल बाद’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण केले होते. नंतर तिने ‘भाभी’, ‘तुम बिन जाना कहाँ’ सारख्या शोमध्ये काम केले. २००३ मध्ये एकता कपूरच्या ‘कुसुम’ शोमुळे ती घराघरात पोहोचली. मग तिने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘नागिन’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका केल्या.
आश्काने टीव्ही मालिकांबरोबरच बिग बॉस ६, झलक दिखला जा ४, नच बलिए ८ व खतरों के खिलाड़ी ४ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ती शेवटची २०१९ मध्ये ‘डायन’ मालिकेत झळकली होती. २०२१ मध्ये तिने अभिनय सोडायचा निर्णय घेतला. व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आश्काने अभिनयाला रामराम केला.
अभिनय सोडण्यापूर्वी २०१८ मध्ये आश्काने ‘रेने कॉस्मेटिक्स’ (Renee Cosmetics) नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला होता. हा व्यवसाय तिने प्रियांक शाह व आशुतोष वलानीबरोबर मिळून सुरू केला. “अनेक वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यामुळे मला मेकअपबद्दल खूप गोष्टी माहित झाल्या. मेकअप एखाद्या व्यक्तीला बदलू शकतो, असं मला वाटतं. त्यामुळेच मी RENÉE ब्रँड सुरू केला,” असं आश्का म्हणाली होती.
५० लाखांपासून सुरुवात, ते १२०० कोटी रुपयांचा ब्रँड
आश्काने रेने कॉस्मेटिक्सची सुरुवात फक्त ५० लाख रुपयांपासून केली होती. सुरुवातीला हा फक्त डिजिटल ब्रँड होता. या ब्रँडची सर्व उत्पादनं फक्त ऑनलाइन विकली जायची. अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, नायकावर रेनेची उत्पादनं विकली गेली. त्यानंतर आश्काने ब्रँडचा ऑफलाइन विस्तार केला.
छोट्या शहरांमधील महिलांवर लक्ष केंद्रित करून उत्पादनांच्या किमती ठरवण्यात आल्या होत्या. यामुळे रेने Lakmé, Maybelline, MyGlamm, Sugar सारख्या मोठ्या ब्रँडशी स्पर्धा करू लागला. पहिल्या दोन वर्षातच रेने कॉस्मेटिक्सने तब्बल १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. २०२४ मध्ये रेने कॉस्मेटिक्सची व्हॅल्यू १२०० कोटींवरून १४०० कोटींवर पोहोचली.
गोव्यात राहते आश्का
आश्का अवघ्या १६ वर्षांची असताना गुजरातमधून मुंबईला आली होती. सुरुवातीला भाड्याच्या घरात राहणाऱ्या आश्काने २३ व्या वर्षी मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं होतं. आश्काने २०१७ मध्ये अमेरिकन बॉयफ्रेंड ब्रेंट गोबल याच्याशी लग्न केलं. दोघेही २०१९ पासून गोव्यात राहतात. ब्रेंटचा गोव्यात योगा स्टुडिओ आहे. या जोडप्याने २०२३ मध्ये आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. आता दोघेही कुटुंबाबरोबर गोव्यात राहतात.