मराठमोळी टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूरच्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. मुलीला १६ व्या वाढदिवशी सेक्स टॉय गिफ्ट करायचे होते, असं तिने म्हटलं आहे. गौतमीने मुलीलाच याबद्दल विचारलं होतं, त्यावर तिने काय प्रतिक्रिया दिली होती, तेही सांगितलं आहे.

“माझी मुलगी १६ वर्षांची झाली तेव्हा मला तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. मी विचार करत होते की मी तिला सेक्स टॉय गिफ्ट देऊ का? मी तिला व्हायब्रेटर गिफ्ट करू का?” असं गौतमी म्हणाली. जेव्हा गौतमी याबद्दल मुलगी सियाशी बोलली, तेव्हा आई सगळं गमतीत म्हणतेय असं तिला वाटलं.

गौतमी कपूरचा हा व्हिडीओ हॉटरफ्लायने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही तिच्या मुलाखतीची व्हिडीओ क्लिप आहे. यामध्ये गौतमीने मुलीला व्हायब्रेटर गिफ्ट करण्याचा विचार का केला याबद्दल सांगितलं. “जेव्हा मी तिच्याशी याबद्दल बोलले तेव्हा मी तिला म्हणाले, ‘सिया, मी असा विचार करत आहे’. ती म्हणाली, ‘आई, तू वेडी झाली आहेस का? तुझं डोकं जागेवर आहे का?'” असं गौतमीने सांगितलं.

गौतमी कपूर म्हणाली, “मी तिला म्हटलं, याचा विचार कर. किती महिला त्यांच्या मुलींकडे जाऊन म्हणतील, ‘तुला माहिती आहे, मी तुला काहीतरी देते आणि तू ते वापरून पाहा?'” मुलीला लैंगिक शिक्षण द्यावं, तिला आयुष्यातील लैंगिक पैलू एक्सप्लोर करू द्यायचा होता त्यामुळे हे गिफ्ट द्यायचा विचार केला असं गौतमी सांगते. “माझ्या आईने जे केलं नाही, तेच मला माझ्या मुलीबरोबर करायचं नाही. तिने सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा,” असं गौतमीने नमूद केलं.

१९ वर्षांची झाली गौतमीची मुलगी

गौतमी कपूर पुढे म्हणाली, “अनेक महिला आयुष्यात आनंद अनुभवल्याशिवाय मरतात. त्यामुळे अशा परिस्थितीत का राहावं? आता माझी मुलगी १९ वर्षांची आहे आणि तिला या गोष्टीचं कौतुक वाटतं की मी किमान तिच्यासाठी अशा गिफ्टचा विचार केला. याबद्दल तिला माझा आदर वाटतो.”

गौतमी कपूर ही लोकप्रिय अभिनेता राम कपूरची पत्नी आहे. गौतमी व राम एका मालिकेत काम करताना प्रेमात पडले होते. त्यांनी कुटुंबियांचा विरोध पत्करून २००३ मध्ये एका मंदिरात लग्न केलं होतं. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सिया आहे आणि मुलाचं नाव अक्स आहे. गौतमी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे, पण मागील काही काळापासून ती रुपेरी पडद्यापासून दूर आहे. दुसरीकडे, राम कपूर ‘मिस्त्री’ मध्ये झळकला होता.