Jasmin Bhasin Aly Goni Relationship : अभिनेता अली गोनी व अभिनेत्री जास्मिन भसीन जवळपास ५ वर्षांपासून एकत्र आहेत. या दोघांची पहिली भेट २०१८ मध्ये रोहित शेट्टीच्या रिअॅलिटी ‘शो खतरों के खिलाडी’मध्ये झाली होती. या शोच्या शूटिंगसाठी अर्जेंटिनामध्ये एकत्र घालवल्यामुळे ते दोघेही एकत्र आले आणि दोघेही चांगले मित्र झाले. जास्मिनला अली आवडत होता.

२०२० मध्ये, अली बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड एन्ट्री म्हणून आला, तिथे त्याने जास्मिनबद्दल असलेल्या भावना कबूल केल्या. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. जास्मिन शीख कुटुंबातून येते, तर अली मुस्लीम आहे. दोघांच्या आंतरधर्मीय नात्याबद्दल जास्मीनच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती, ते तिने सांगितलं.

आता एका मुलाखतीत जास्मिनने तिच्या शीख पालकांनी एका मुस्लीम मुलाबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल कशी प्रतिक्रिया दिली होती हे सांगितलं. “माझ्या आईवडिलांना अलीबरोबरचं माझं नातं अचानक समजलं. कारण त्यांना बातम्यांमधून आमच्या नात्याबद्दल माहिती मिळाली. पण त्यांना अलीच्या धर्माबद्दल कधीही काही अडचण नव्हती”, असं जास्मिन म्हणाली.

जास्मिनच्या कुटुंबाने दिला सल्ला

अलीबद्दल समजल्यावर आपल्या मोकळ्या विचारांच्या सुशिक्षित कुटुंबाने फक्त एकच सल्ला दिला होता, असं जास्मिनने सांगितलं. “त्यांनी मला एकच सल्ला दिला की मी ज्या व्यक्तीबरोबर आहे, त्याच्याबरोबर राहण्यासाठी कधीही तडजोड करू नये. पण अलीला भेटल्यानंतर ते आमच्यासाठी खूप आनंदी झाले. आमच्या नात्यात आम्हाला कधीही कोणतीही अडचण आली नाही कारण मी कधीही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा धार्मिक दबाव आणला नाही आणि त्याच्याकडूनही मला कधीच कोणताही धार्मिक दबाव आला नाही. आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो आणि एकमेकांना आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी जागा देतो,” असं जास्मिन सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

तुलनेचा फरक पडत नाही – जास्मिन

जास्मिनचं करिअर टीव्हीवर राहिलंय. त्यामुळे अनेकदा जास्मिनची तुलना दीपिका कक्करशी केली जाते. दीपिकाने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील तिचा सह-कलाकार शोएब इब्राहिमशी लग्न केलं आहे. जास्मिन म्हणते की तिला अलीचा धर्म वेगळा असल्याचं काहीच वाटत नाही आणि तिला धर्मावरून बोलल्या जाणाऱ्या गोष्टींचा फरक पडत नाही. “इतरांशी तुलना झाल्याने मला फरक पडत नाही. लोक बोलत राहतात, स्वतःचं मनोरंजन करत राहतात, मला त्याचा त्रास होत नाही,” असं जास्मिनने नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्मिनचा बॉयफ्रेंड अली गोनी हा क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशाचा एक्स बॉयफ्रेंड आहे. हार्दिकला भेटण्यापूर्वी नताशा अलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. अली व नताशा यांनी एका रिअॅलिटी शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. नंतर काही कारणांनी दोघांमध्ये दुरावा आला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर अलीच्या आयुष्यात जास्मिन आली आणि बऱ्याच वर्षांपासून ते एकत्र आनंदाने राहत आहेत.