TV Actress Share Traffic Video : वाहतूक कोंडी ही मुंबईसह इतर शहरातील एक प्रमुख समस्या बनली आहे. अनेक नागरिक या वाहतूक कोंडीटुन्न वाट काढत प्रवास करतात. सामान्य जनतेसह मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकरांनाही अनेकदा या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबद्दल अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.
अशातच एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने मुंबईच्या मालाडमधील वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर केला आहे, ही अभिनेत्री म्हणजे कश्मिरा शाह. कश्मिरा अनेक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच कश्मिराने शेअर केलेला ट्रॅफिकचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. १५ ऑगस्ट रोजी कश्मिराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती स्वतः गाडी चालवत असून, मुंबईच्या मालाडमधील मीठ चौकी येथे ट्रॅफिकमध्ये अडकली असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये ती मराठी आणि हिंदी भाषेत म्हणते, “अरे यार, मी मागच्या अर्ध्या तासापासून गाडीत बसून आहे. मालाडच्या मीठ चौकीमध्ये इतकं ट्रॅफिक आहे की, गाडी हलायलाही जागा नाहीये. इतके लोक मालाडमध्ये राहतात तरी कुठे? हे सगळं बघून डोकंच सटकतंय. गाडी फक्त १० इंच पुढे सरकलीय इतकंच!”
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “तुम्हीसुद्धा अशा ट्रॅफिकमध्ये अकडला आहात का? इतक्या वर्षांनी मी मालाडमध्ये आले आणि माझं हे असं स्वागत झालं.” दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “मालाड नाही पूर्ण मुंबईत असं ट्रॅफिक आहे”, “हे रोजचच आहे”, “आम्हीसुद्धा रोज अशा ट्रॅफिकमध्ये अडकतो” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कश्मिरा नुकतीच ‘लाफ्टर शेफ्स’ या कुकिंग रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. यात तिच्याबरोबर नवरा कृष्णा अभिषेकही होता.