Krutika Deo on Chetan Vadnere: मालिका, चित्रपट, नाटक, तसेच वेब सीरिज यांमधील कलाकारांना पाहत असताना त्यांच्यात ऑफस्क्रीन नाते, बॉण्डिंग कसे असेल, असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो.
आता अभिनेत्री कृतिका देव व अभिनेता चेतन वडनेरे हे लवकरच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव या मालिकेत ते प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. या मालिकेचे काही प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. त्या प्रोमोंना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.
स्टार प्रवाह वाहिनीच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातदेखील हे कलाकार सहभागी झाल्याचे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच या दोन्ही कलाकारांनी ‘ लोकमत फिल्मी’शी संवाद साधला. एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे, यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.
कृतिका देव काय म्हणाली?
कृतिका देव म्हणाली, “माझी आणि चेतनची आधीपासून ओळख नव्हती. पण, मी त्याचं काम टीव्हीवर पाहिलं होतं. आम्ही जेव्हा मॉक टेस्टला भेटलो, ती आमची पहिली भेट होती. तेव्हा मला कळालं की, तोसुद्धा नाशिकचा आहे. मग आमच्या नाशिकच्या गप्पा खूप रंगल्या. मॉक टेस्टलाच पहिलीच आमची भेट झाली होती.”
गणेशोत्सवात दोघांचा डान्स आहे का? यावर कृतिका म्हणाली, “आमचा छान डान्स,. ज्याची आम्ही छान तालीम केलेली आहे. आम्हाला खूप उत्सुकता आहे. चेतन आता सरावलेला आहे.” यावर चेतन म्हणाला, “आपल्याला काही गोष्टी कळतात, तशा कोरिओग्राफरलादेखील गोष्टी कळतात. मी आल्यानंतर ते मला झाड किंवा फूल बनण्यासाठी देतात. चेतन आहे म्हटल्यावर ते सोपं काहीतरी देतात. आम्ही डान्स केला, मजा आली.”
तसेच ‘अल्ट्रा बझ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत कृतिका मालिकेबद्दल म्हणाली, “खूप उत्सुकता वाढवणारी गोष्ट आहे. प्रेक्षकांना मालिका बघण्यासाठी मजा येणार आहे. १५ सप्टेंबरपासून ही मालिका प्रदर्शित होणार आहे. मी सखी कामत हे पात्र साकारत आहे. ती श्रीमंत घरातील, आजच्या काळातील, मनानं निर्मळ अशी ती मुलगी आहे. आईचं पात्र रूपालीताई करतेय. तिचं नाव तेजस्विनी कामत, असं आहे. आमचं परवा शूट झालं. आम्हाला काम करताना मजा येतेय. नवीन नवीन सीन शूट करताना छान वाटतंय.”
चेतन म्हणाला, “मी अजून शूटिंगला सुरुवात केली नाही. दोन दिवसांत माझं शूट लागेल. तर यांचं शूट सुरू झालंय. याच्या गमती जमती सगळं असं सुरू झालं आहे. मी आता शूटिंगला सुरू करेन तेव्हा काही गोष्टी कळतील. पण, प्रोमोपेक्षा पात्र थोडंसं मजेदार आहे, मी इतकंच सांगेन. एपिसोड बघितल्यानंतर हा आणि आताचा हा इतका वेगळा कसं काय, असं तुम्हाला वाटेल. पण, त्याच्या गमतीजमती एपिसोडमध्ये उलगडणार आहेत. त्यामुळे आता सांगत नाही.”
दरम्यान, आता मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.