अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या सासुबाई व अभिनेत्री मुग्धा शाह या सध्या त्यांच्या मालिकेमुळे चर्चेत आहेत. मुग्धा ‘सन मराठी’वरील ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. मुग्धा बऱ्याच काळाने मराठी मालिकेमध्ये काम करत आहेत. त्यांच्या कामाबरोबर त्यांच्या मुलाखतीमुळे त्यांची चर्चा होत आहे.
मुग्धा यांनी ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. आयुष्यात खूप हाल सोसावे लागले, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं. मुग्धा अवघ्या तीन महिन्यांच्या असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. आईच्या जाण्यानं त्यांना त्यांच्याच घरामध्ये दोन वेळेचं जेवणही मिळत नव्हतं, असं त्यांनी सांगितलं. लग्नापूर्वी माहेरी त्यांना कधीच प्रेमाने वागवलं गेलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे का जिच्यासमोर तुम्ही कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होऊ शकता?” असा प्रश्न मुग्धा मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या, “तेव्हाही नव्हतं आणि आजही असं कोणी नाहीये. कारण तेव्हा घरच्या चौकटीत होते आणि बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. त्यावेळी जर कोणाशी बोलले जरी तर लाथा पडायच्या. काय बोलत होतीस? कोणाशी बोलत होतीस? असं विचारलं जायचं. खरं तर तेव्हा या सगळ्या गोष्टींसाठी वेळही नव्हता. कारण २० वर्षांची असताना लग्न झालं, नंतर सासुरवास सुरू झाला, मुलं झाली.”
मुग्धा त्यांच्या संघर्षाबद्दल पुढे म्हणाल्या, “माझी एक वाईट सवय आहे की, मी पटकन समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते. पण मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा असं जाणवतं की आजपर्यंत माझ्यावर कोणी प्रेमच केलेलं नाही. प्रेम हा शब्द माझ्या नशिबातच नाहीये. पण आता मी हेच माझं नशीब आहे. प्रारब्ध आहे याचा मी स्वीकार केला आहे.”
दरम्यान, मुग्धा शाह या मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या सासुबाई आहेत. तर त्या हृताला खूप पाठिंबा देतात. सूनेच्या प्रत्येक चित्रपटाच्या कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावतात. हृता व तिच्या सासूचं एकमेकींबरोबर घट्ट नातं आहे. ‘झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात या दोघी झळकल्या होत्या. तेव्हा या दोघींनी एकमेकींचं भरभरुन कौतुकही केलं होतं.