‘दिया और बाती’ फेम टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारने अभिनयातून संन्यास घेतला आहे. २७ वर्षे अभिनयविश्वात काम केल्यानंतर तिने संसार व करिअर सगळ्या गोष्टींचा त्याग केला. नुपूर भगवे कपडे परिधान करून देशभरात फिरते. तसेच ती तिचा बहुतांशी वेळ हिमालयात घालवते. अध्यात्माकडे कल होता, त्यातूनच हा निर्णय घेतल्याचं नुपूरने सांगितलं.
नूपुरचा जन्म जयपूरमध्ये झाला होता. नंतर तिचे कुटुंब मुंबईला आले. तिने मुंबईतच शिक्षण पूर्ण केले. ती उत्तम डान्सर होती. तसेच तिला अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने मॉडेलिंमध्ये नशीब आजमावलं. काही मालिका केल्या आणि मालिकाविश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं.
अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरमध्ये नुपूर अलंकरने मुकेश खन्ना, गौरव खन्ना, यामी गौतम, पारुल गुलाटी, श्वेता गौतम, चंदन के आनंद आणि इतर अनेक कलाकारांबरोबर काम केलं. सप्टेंबर २०२२ मध्ये, नुपूर अलंकारने अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी अभिनयविश्वस कायमचे सोडत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
नुपूरने तिच्या निर्णयाबद्दल काय म्हटलं होतं?
“मला माझं आधीचं आयुष्य आठवत नाही. माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याच प्रकारचा ड्रामा नव्हता. मी चित्रपटसृष्टीत असताना मला लोकप्रियता आणि यशाची चिंता होती. पण आता मला कशाचीच चिंता नसून माझ्या जीवनात शांतता आहे,” असं नुपूर ETimes शी बोलताना म्हणाली होती. नुपूरने पती अलंकार श्रीवास्तवशी सर्व संबंध तोडल्याचं सांगितलं होतं. पतीने तिला अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी सर्व नातेसंबंधातून मोकळं केलंय, परंतु दोघे अद्याप कायदेशीररित्या वेगळे झालेले नाहीत. दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतलेला नाही.

नुपूर पूर्वीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली होती. २०१९ मध्ये तिची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली होती. दैनंदिन खर्च भागवणंही कठीण झालंय, तसेच आर्थिक अडचणींमुळे घर गहाण ठेवण्याचा विचार करत असल्याचं तिने म्हटलं होतं.
नुपूर अलंकारने ‘शक्तिमान’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘दिया और बाती’, ‘तंत्र’ आणि ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. तसेच तिने काही चित्रपटही केले आहेत. आता ती देशभरातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन आणि आशीर्वाद घेते.