‘तुझसे है राबता’ व ‘फना: इश्क में मरजावां’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री रीम शेख लोकप्रिय झाली. अवघ्या २२ वर्षांच्या रीम शेखने एक गुड न्यूज शेअर केली आहे. तिने स्वतःला एक आलिशान गाडी भेट दिली आहे. तिचा तिच्या गाडीबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रीम शेखने एक नवीन लक्झरी कार BMW X1 खरेदी केली आहे. ही एक लक्झरी SUV आहे, ज्याची भारतातील सुरुवातीची किंमत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. रीमने मुंबईत ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. तिच्याबरोबर ‘तुझसे है राबता’मधील सहकलाकार सेहबान अझीमदेखील होता.
‘तुझसे है राबता’ हा शो २०२१ मध्ये संपला, पण रीम व सेहबान यांची मैत्री अजूनही आहे. रीमचे नव्या गाडीबरोबरचे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत. रीमची मैत्रीण जन्नत झुबेरने तिचा बीएमडब्ल्यूबरोबरचा फोटो शेअर केला. “बालपणीच्या हसण्यापासून ते मोठे होण्यापर्यंत, माझ्या ‘बेबी’ने स्वतःला बीएमडब्ल्यू भेट दिली आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो हे म्हणणं पुरेसं नाही! तुला आणखी यश मिळो, तुझी सगळी स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी शुभेच्छा,” असं जन्नतने रीमसाठी कॅप्शन लिहिलं आहे.


‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये झळकतेय रीम
रीम शेख २२ वर्षांची आहे. रीमने कमी वयातच अभिनयविश्वात मालिका करून यश मिळवलं. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या रीमने आतापर्यंत गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने ‘तुझसे है राबता’ मालिकेत कल्याणी नावाची भूमिका केली होती, या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ व ‘फना: इश्क में मरजावां’ या मालिका केल्या. तिने काही म्युझिक व्हिडीओही केले. सध्या ती ‘लाफ्टर शेफ्स २’ मध्ये सहभागी झाली आहे.