Muramba Fame Actress Talks About Pregnancy : अनेकदा अभिनेत्रींना मूल झाल्यानंतर काम मिळणार नाही याची भीती असते. परंतु, अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी प्रेग्नन्सीनंतरही इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. असंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीलाही मूल झाल्यानंतर काम मिळणार नाही याची भीती होती; पण ती आजही मालिका, रंगभूमी या माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. याबाबत तिने एका मुलाखतीमधून सांगितलं होतं.

मूल झाल्यानंतर काम मिळणार नाही याची भीती होती, असं वक्तव्य लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर हिनं केलेलं. अदिती सारंगधर हिनं ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. त्यामध्ये तिला “तुला मूल झाल्यानंतर काम न मिळण्याची भीती होती का,” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अदितीनं, “हो, मला मूल झाल्यानंतर काम मिळणार नाही याची भीती होती”, असं उत्तर दिलेलं.

अदिती म्हणालेली, “गरोदर असताना मला ‘लक्ष्य’ ही मालिका सोडावी लागली होती. त्याबरोबर ‘प्रपोजल’ हे नाटकसुद्धा बंद करावं लागलं. गरोदर असल्यामुळे हातातलं इतकं चांगलं काम थांबवावं लागलं. करिअरच्या शिखरावर असताना ब्रेक घ्यावा लागला. कारण- मला दिवसला २०-३० उलट्या व्हायच्या. मला तेव्हा खूप त्रास होत होता. पण, मी त्यावेळी वाईट न वाटून घेता, विरंगुळा म्हणून स्पॅनिश भाषा शिकले”.

गरोदरपणाबद्दल अदिती म्हणालेली, “कधीच आंबा न खाणारी मी त्या काळात खूप आंबे खाल्ले. पण, बाळ झाल्यानंतर माझ्याकडे त्याला सांभाळायला कोणीच नव्हतं. आई, सासू किंवा याबाबत सांगणारं कोणीही नव्हतं. तेव्हा माझ्याकडे काही पर्याय नव्हता म्हणून मी स्वत:साठी खंबीरपणे उभी राहिले होते”.

अदिती याबाबत पुढे म्हणाली, “मी त्यानंतर पोस्टपोर्टम डिप्रेशनमधून गेले होते. परंतु, त्यामधून मला माझ्या थेरपिस्टनं बाहेर काढलं. पण त्यानंतरही काही ना काही सुरू होतंच. माझ्याकडे तसं पाहिलं तर सगळं आहे. पैसा आहे, चांगला नवरा आहे, मूल आहे, घर, गाड्या, सुख-समाधान सगळं आहे; पण आजारपण काही संपत नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदिती सारंगधरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून काम केलं आहे. अदिती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ती ‘वादळवाट’मुळे. या मालिकेत ती मुख्य भूमिकेतून झळकली होती. त्यानंतर अदितीने, ‘अभिलाषा’, ‘लक्ष्य’, ‘ह.म. बने तु.म. बने’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘माझे मन तुझे झाले’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या अदिती ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुरांबा’ या मालिकेतून इरावती हे पात्र साकारताना पाहायला मिळत आहे.