ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मराठी मनोरंजनविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. नारकर जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे रील्स व्हिडीओ देखील सर्वत्र तुफान व्हायरल होत असतात. सध्या ही जोडी रंगभूमीवर एकत्र काम करत आहे. याशिवाय दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात.

ऐश्वर्या व अविनाश नारकर दोघंही त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत नुकतेच एका खास जागी लंच डेटसाठी गेले होते. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. याचा व्हिडीओ ऋतुजाने इन्स्टाग्रामवर शेअर करत या दोघांचेही आभार मानले आहेत.

ऋतुजा बागवेने काही महिन्यांपूर्वीच मरोळ परिसरात तिचं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं. गेल्या काही महिन्यांमध्ये या रेस्टॉरंटला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी भेट दिल्याचं पाहायला मिळालं. आता ऋतुजाच्या रेस्टॉरंटमध्ये चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ऐश्वर्या व अविनाश नारकर पोहोचले आहेत. हे दोघंही ऋतुजाबद्दल काय म्हणाले जाणून घेऊयात…

“आज आम्ही ऋतुजाच्या फूडचं पाऊल या रेस्टॉरंटमध्ये आलोय. आमची लंच डेट होती…आणि आम्ही खूप छान अशा शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेतला. कारण, लोकांना एवढे दिवस हे रेस्टॉरंट जनरली इथल्या नॉनव्हेज फूडसाठी माहिती आहे. पण, इथे व्हेजही फार उत्तम मिळतं. शेवाची भाजी, खानदेशी वांग्याचं भरीत, तांदळाची भाकरी, इंद्रायणी भात, भाजणीचे वडे या सगळ्या पदार्थांचा आम्ही आस्वाद घेतला. तुम्ही सुद्धा नक्की या.” असं ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी सांगितलं.

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या हे दोघंही ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात काम करत आहेत. त्यांच्यासह या नाटकात अंकिता दिप्ती, साकार देसाई, अपूर्वा गोरे, नंदिता पाटकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.