Aly Goni Ganapati Visarjan Video Controversy : लोकप्रिय टीव्ही अभिनेता अली गोनीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये जस्मिन भसीन आणि तिची मैत्रीण निया शर्मा यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. पण, अभिनेता ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्यानं त्याला ट्रोल करण्यात आलं.

या ट्रोलिंगवर आता अलीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे तो ‘गणपती बाप्पा मोरया’ का म्हणाला नाही, यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे. Filmygyan ला दिलेल्या मुलाखतीत अली म्हणाला, “मी कधी विचारच केला नाही की, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याने इतका मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो. हे फक्त मी बोलायचं म्हणून बोलत नाहीय किंवा अभिनयसुद्धा करत नाहीय. अभिनय करायचाच असता तर तिथेही केला असता.”

यापुढे तो म्हणाला, “तेव्हा मला काही कळलंच नाही. मी माझ्याच विचारात होतो. मी काय विचार करत होतो हेही मला माहीत नव्हतं. पण, मी ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याने इतका मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे मला अजूनही कळत नाहीये. इतके रिकामटेकडे लोकसुद्धा आहेत. मी बघत असतो की सोशल मीडियावर काय-काय चाललंय. जर मला कोणत्या धर्माचा अनादर करायचा असता, तर मी इतका तयार होऊन तिथे गेलोच नसतो.”

यानंतर अलीने सांगितलं, “एकतर मी पहिल्यांदाच गणपतीसाठी गेलो आहे. याआधी मी कधीच गणपतीला गेलो नाही. मला माहीत नाही, गणपतीची पूजा वगैरे होते, त्यामुळे तिकडे जाऊन काय करतात हेही मला माहीत नाही. मी आजपर्यंत हाच विचार करत आलो आहे की, माझ्याकडून अशा ठिकाणी काही चूक होऊ नये, कारण मी लगेच काहीतरी बोलून जातो किंवा काहीतरी करतो. उदाहरण म्हणून… जसं मी मशीदमध्ये नमाज पठण करायला जाताना एखाद्या मुस्लीम नसलेल्या मित्राला घेऊन गेलो, तर तिकडे नेमकं काय केलं जातं हे त्याला माहीत असेल का? नाही ना… तसंच मलाही हे माहीत नव्हतं.”

पुढे तो असं म्हणाला, “आमच्या धर्मात हे मान्य नाही, आमच्या धर्मात पूजा होत नाही. आम्ही नमाज पठण करतो आणि आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो. आमच्या कुराणमध्येही ते लिहिलंय आणि मी ते करतो. मी जम्मूमध्ये वाढलो आहे आणि ते मंदिरांचं शहर आहे. मी जिथे राहत होतो तिथेही अनेक मंदिरं होती. मी अनेकदा माझ्या काही मित्रांबरोबर मंदिरांमध्ये गेलो आहे, त्यामुळे मला या सगळ्याविषयी आदर आहे. माझ्याकडून कोणत्याच धर्माबद्दल चुकीचा शब्द निघणार नाही. फक्त हिंदू धर्मच नव्हे; तर कोणत्याच धर्माबद्दल मी कधीच चुकीचं बोलणार नाही.”

यानंतर त्याने सांगितलं, “आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात जस्मिनने माझ्या हनुवटीला हात लावला आहे. गणपतीच्या एक-दोन-तीन-चार आणि पुढे पाच-सहा-सात-आठ अशा घोषणा करत असताना कुठे तरी ‘क्युट’ हा शब्द आला; तर तेव्हा जस्मिनने माझ्या हनुवटीला हात लावत ‘हा सुद्धा क्युट आहे’ असं म्हटलेलं. तर लोकांनी त्या व्हिडीओवर असं म्हटलं की, जस्मिन मला ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणायला सांगत असूनही मी बोलत नाहीय. पण, खरंतर तसं काहीच झालं नव्हतं. यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा आल्या. माझ्याबद्दल तक्रार करावी, अशी मागणी केली जात आहे.”

यानंतर अली म्हणाला, “मी मुस्लीम आहे म्हणून माझ्याबद्दल हे सगळं बोललं जातंय. मग ज्या हिंदूंच्या घरी गणपती बसवला जात नाही ते हिंदू नाहीत का? माझा ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलतानाचा व्हिडीओ अनेक लोकांनी पोस्ट केला, पण कुणीतरी एकानेच त्यावर मी गणपती बाप्पा मोरया बोलत नसल्याचं लिहिलं आणि तो व्हायरल झाला. मग एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) ज्यांचं ज्यांचं लाल झेंड्याचं प्रोफाईल होतं त्यांच्यासाठी मी आतंकवादी आहे, मला पाकिस्तानात जायला पाहिजे, मी लव्ह-जिहाद करत आहे अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत. माझ्यासाठी कोणताही धर्म महत्त्वाचा नसून माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे. अनेकदा वाईट-वाईट कमेंट्स बघून मला ट्रोल करणाऱ्यांबद्दलच दु:ख होतं.”