Amit Bhanushali Shares Court Drama Story : ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या मालिकेत कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे. यामध्ये अर्जुनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशातच आता अर्जुन म्हणजेच अमित भानुशालीने कोर्ट सीनमुळे एकदा त्याला त्याच्या वकील मित्राचा फोन आल्याचं सांगितलं आहे.
अमित भानुशाली मालिकेव्यतिरिक्त सोशल मीडियावरही सक्रिय असतो, त्यामुळे त्याचा तिथेही मोठा चाहतावर्ग आहे. अशातच अमितने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने सध्या मालिकेत सुरू असलेल्या कोर्ट ड्रामाबद्दल सांगितलं आहे. यामध्ये अमितने त्याने कोर्ट सीनमध्ये केलेली एक चूक त्याच्या खऱ्या आयुष्यातील वकील मित्राने हेरल्याबद्दल सांगितलं आहे.
अमित भानुशालीने ‘स्टार मीडिया मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने याबाबत सांगितलं आहे. अमित म्हणाला, “जेव्हा स्क्रिप्ट आमच्या हातात येते तेव्हा माझे काही मित्र आहेत, जे वकील आहेत उच्च न्यायालयामध्ये. मी त्यांना विचारायचो की हे असं आहे, आपण काय करू शकतो यामध्ये; त्या पद्धतीने आम्ही पुढे जायचो, पण खूप मज्जा यायाची.”
अमितला पुढे या मुलाखतीमध्ये, “तू एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतंस की, तुला खऱ्या वकिलांचे फोन आले होते, तो नेमका काय किस्सा होता?” असं विचारण्यात आलेलं. यावर अमित म्हणाला, “आपण जेव्हा चित्रपट किंवा मालिकेचं चित्रीकरण करत असतो तेव्हा काही गोष्टींची सिनेमॅटिक लिबर्टी घेतो. तसंच मालिकेतील कोर्ट सीनदरम्यान एक किस्सा झाला होता, मी त्या सीनमध्ये न्यायाधीशांसमोर असं म्हणालो होतो की, तुम्ही हे नाही करू शकत.”
अमित भानुशालीला आलेला वकील मित्राचा फोन
अमित याबाबत पुढे म्हणाला, “तेव्हा माझ्या वकील मित्राने फोन करून सांगितलं की, न्यायाधीशांसमोर तू, तुम्ही असं नाही करू शकत; हे म्हणूच शकत नाही. त्यांचा निकाल शेवटचा असतो आणि तू न्यायाधीशांबरोबर वाद घालू शकत नाहीस. तेव्हा मी त्याची माफी मागितली आणि म्हटलं की, पुढे जर कधी असा सीन आला तर मी स्वत: समोरून सांगेन की असं होता कामा नये.”
अमित भानुशाली पुढे कोर्ट ड्रामाबद्दल म्हणाला, “प्रेक्षकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय ते पाहून काम करण्याचं बळ येतं. ३० दिवसांचं टार्गेट होतं आमच्यासमोर. ३० दिवसांत आम्हाला निकालापर्यंत पोहोचायचंच होतं. तुम्ही आजारी असलात किंवा काही काम कधीच थांबत नाही.”