Amruta Deshmukh And Prasad Jawade’s 2nd Engagement Anniversary : अमृता देशमुख-प्रसाद जवादे ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनी दीड वर्षापूर्वी लग्नगाठ बांधली होती. या जोडीने १८ नोव्हेंबर २०२३ला लग्न केलं होतं. एकमेकांसह लग्न करण्यापूर्वी या दोघांनी हटके अंदाजात साखरपुडा करत सोशल मीडियावरुन थेट पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. अशातच आता या दोघांच्या साखरपुड्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
साखरपुड्याला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अमृता देशमुखने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने प्रसादबरोबरचे काही खास क्षण टिपलेले पाहायला मिळत आहेत. अमृताने इन्स्टाग्रामवर नवऱ्याबरोबरचा खास व्हिडीओ शेअर करत त्याला खास कॅप्शनही दिलं आहे. अमृताने या व्हिडीओला कॅप्शन देत असं म्हटलं की, “काही लोक रोका करतात, काही रिंग सेरेमनी करतात. आम्ही कॅमेरा, लाईट्स, कमिटमेंट केलं होतं”.
अमृता पुढे म्हणाली, “दोन वर्षांनंतर अजूनही आम्ही तसेच आहोत. फार काही बदल झालेला नाही. दोन वर्षे झाल्यानिमित्त शुभेच्छा”. यावेळी तिने प्रसादला टॅग केलं आहे. अमृताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अमृता व प्रसाद यांचे दोन वर्षांपूर्वीचे काही खास फोटो पाहायला मिळत आहेत. तिच्या या पोस्टखाली त्यांच्या चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यामधून अनेकांनी या जोडीला त्यांच्या साखरपुड्याला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता व प्रसाद यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, हे दोघे पहिल्यांदा ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात एकत्र झळकले होते. तिथेच या दोघांची एकमेकांसह ओळख झाली आणि ‘बिग बॉस’च्या घरातच दोघांचे सूर जुळले. पुढे ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर या जोडीने काही दिवसांनंतर एकमेकांसह लग्न करण्याचा निर्णय घेतला.
प्रसाद व अमृता सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, प्रसाद सध्या ‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे आणि अमृता ‘नियम व अटी लागू’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या नाटकासाठी तिला ‘झी नाट्य गौरव’चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
दरम्यान, अमृता नुकतीच ‘झी मराठी’वरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतही झळकली होती. यापूर्वी तिने ‘फ्रेशर्स’, ‘मी तुझीच रे’, ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘अस्मिता’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.