Ankita Lokhande Shares Post For Late Actress Priya Marathe : ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी टेलिव्हिजनवरील गाजलेल्या मालिकेत अनेक मराठी कलाकार झळकले होते. याच मालिकेच्या सेटवर अंकिता लोखंडे ( अर्चना ) आणि दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे ( वर्षा ) यांची पहिली भेट झाली होती. प्रिया मराठेच्या अकाली निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन सृष्टीतील प्रत्येकालाच मोठा धक्का बसला आहे. प्रियाच्या आठवणीत अंकिताने भावुक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
अंकिता व प्रिया या दोघींची ‘पवित्र रिश्ता’ मालिकेपासून खूप घट्ट मैत्री झाली होती. या दोघीही एकमेकींना ‘वेडे’ अशी हाक मारायच्या. अंकिताच्या घरच्या गौरीपूजेला प्रिया नेहमी उपस्थित असायची. त्यामुळे यावर्षी ‘वेडे’ तुझी खूप आठवण येणार असं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ३१ ऑगस्टला मीरारोड येथील राहत्या घरी प्रिया मराठेचं निधन झालं. गेल्या २ वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती.
अंकिता लोखंडे दु:ख व्यक्त करत लिहिते, “पवित्रा रिश्ता’ मालिकेतील प्रिया माझी पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया…आम्हा तिघींची एकत्र गँग होती. आम्ही तिघी नेहमी एकत्र असायचो…खूप मजा करायचो. प्रिया, प्रॅट्स ( प्रार्थना ) आणि मी आम्ही तिघी एकमेकींना मराठीत प्रेमाने ‘वेडे’ म्हणायचो. ‘वेडे’ अशीच हाक मारायचो. ती माझ्याबरोबर माझ्या चांगल्या दिवसांमध्ये होती आणि दु:खातही प्रियाने माझी साथ कधीच सोडली नाही. जेव्हा-जेव्हा मला तिची गरज भासली त्या प्रत्येक क्षणाला प्रिया माझ्याबरोबर होती. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर ती नेहमी गौरीच्या आरतीला माझ्याकडे यायची…तिने आमच्या घरची आरती कधीही चुकवली नव्हती. आता यावर्षी प्रिया मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन…माझी वेडे…खरंच खूप आठवण येतेय तुझी…”
“प्रियाने गेल्या काही वर्षांत खूप धीराने, खंबीरपणे या आजाराचा सामना केला. आज ती आपल्याबरोबर नाहीये…हे लिहिताना सुद्धा माझं मन भरून येतंय. माणूस आपल्या सुंदर हास्यामागे किती काय-काय सहन करत असतो हे कधीच कोणाला कळू शकत नाही याची जाणीव आता ती सोडून गेल्यावर होतेय.” असं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अंकिता शेवटी लिहिते, “प्रिया…माझी प्रिय वेडे…तू कायम माझ्या हृदयात राहशील, तुझी प्रत्येक आठवण कायम माझ्या मनात असेल. आपण पुन्हा भेटेपर्यंत… ओम शांती”
दरम्यान, प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया आणि शंतनू मोघे यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एकत्र कामही केलं होतं.