Kokan Hearted Girl Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अंकिता वालावलकर घराघरांत लोकप्रिय झाली. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची लाडकी ‘कोकण हार्टेड गर्ल’ तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडल्यावर अंकिताने ती लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानुसार अंकिता व मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कुडाळ येथे थाटामाटात पार पडला.

अंकिता व कुणाल यांची पहिली भेट ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान झाली होती. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोडप्याने यंदा १६ फेब्रुवारीला लग्न केलं. लग्न झाल्यावर अंकिताची लग्नपत्रिका इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली होती. यामध्ये कुणालचं मूळ गाव अलिबाग असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, अंकिता व कुणाल यांचा गृहप्रवेश माणगावला करण्यात आला. यावेळी अंकिताच्या सासरच्या मंडळींनी सुंदर अशी फुलांजी सजावट करून सुनबाईंचं स्वागत केलं होतं. यावरून अंकिताचं सासर नेमकं कुठे आहे? अलिबाग की माणगाव अशा चर्चा रंगल्या होत्या. तिचे चाहते सुद्धा गोंधळले होते. अखेर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये याबद्दल खुलासा केला आहे.

अंकिता या व्हिडीओमध्ये म्हणते, “हो मला माहितीये की, तुम्ही सगळेजण गोंधळलेले असणार…अलिबाग की माणगाव हिचं नेमकं सासर कुठे आहे? कुणालचं खरं घर हे अलिबागमध्येच आहे आणि तो अलिबागचा आहे. पण, त्याचे वडील पोलीस खात्यात असल्याने त्यांचं पोस्टिंग माणगावमध्ये आहे. यामुळेच त्यांनी माणगावमध्येही जागा घेतली होती. त्यांनी तिथे घर बांधलं. कुणालचं बालपण माणगावात गेलं आणि त्याचं शिक्षणही तिकडेच झालं. त्यामुळे त्यांची अलिबाग आणि माणगावमध्ये अशी दोन घरं आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखला जातो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ चित्रपटातील गाण्यांना कुणालने त्याच साथीदार करणच्या साथीने संगीत दिलं होतं. याशिवाय कुणाल-करण या जोडीने ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांना देखील संगीत दिलेलं आहे. ‘तुला जपणार आहे’, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचा यात समावेश आहे.