Apurva Nemlekar : ‘बाप’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोचं अस्तित्व हे प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचं असतं. पण ते अस्तित्वचं एकेदिवशी नाहीसं झालं तर कोणताही माणूस अचानक कोलमडून पडतो. आयुष्यातला बापमाणूस निघून गेला की, आयुष्याला अर्थच राहत नाही. मात्र ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत आपलं आयुष्य जगावं लागतं. असंच वडिलांच्या जाण्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर खचून गेली होती.
वडिलांच्या निधनानंतर अपूर्वाने अनेक कठीण परिस्थितींना तोंड देत संघर्ष केला आहे. अपूर्वा याआधी अनेकदा वडिलांबद्दल सोशल मीडियाद्वारे व्यक्त झाली आहे. अशातच आज तिने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. जुना फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “पप्पा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्याशिवाय जगून आता जवळपास ८ वर्षे झाली आहेत आणि तरीही हा दिवस अजूनही तुमचाच आणि कायमच खास वाटतो. तुमचा एकही वाढदिवस माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय आणि हृदयात वेदना झाल्याशिवाय गेला नाही.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आज मी कदाचित तुम्हाला मिठी मारू शकणार नाही किंवा तुमचा आवाज ऐकू शकणार नाही, पण मी अजूनही पूर्वीप्रमाणे ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा’ असे म्हणते. माझ्या या शुभेच्छा तुम्ही कुठून तरी ऐकू शकाल अशी मला आशा आहे. तुमची लहान मुलगी आता मोठी झाली आहे. मी काही गोष्टी साध्य केल्या आहेत आणि तुम्ही ज्या वादळांमध्ये मला टिकवून ठेवले असते, त्या वादळांना मी तोंड दिले आहे. हे सर्व पाहण्यासाठी आणि माझ्या आनंदासाठी तुम्ही आज हवे होतात हे मला कायमच वाटतं राहतं. असा एकही क्षण जात नाही जिथे मला तुमची आठवण येते.”
यानंतर तिने असं म्हटलं आहे की, “मला तुमचे हास्य आणि तुमचा सल्ला कायमच आठवतो. पण याहून अधिक मला तुम्ही कसं सुरक्षित सांभाळलं, मला मोठे होताना पहिले आणि मनापासून प्रेम केले याची सर्वात जास्त आठवण येते. ते प्रेम अजूनही माझ्यात हृदयात आहे आणि ते नेहमीच राहील. आपण पुन्हा भेटेपर्यंत मी माझ्या हृदयात तुमचा गौरव करत राहीन आणि तुम्हाला कायम अभिमान वाटेल अशा पद्धतीने जगत राहीन. पप्पा, माझे तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमची लहान मुलगी. अप्पू.”
दरम्यान, ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या सीझनची ती उपविजेती ठरली होती. याशिवाय ती अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सावनी ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे