Ashok Saraf & Nivedita Saraf : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन व आदर्श जोडी म्हणून अशोक व निवेदिता सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. गेली वर्षानुवर्षे ही जोडी रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. घरातून विरोध, वयात अंतर, दोघांच्या प्रेमाला जवळच्या मित्राने दिलेली खंबीर साथ असे सगळे चढउतार या दोघांनी एकत्र पाहिले अन् शेवटी साता जन्माचे जोडीदार झाले.

अशोक व निवेदिता यांची जोडी त्यांचे खास मित्र सचिन पिळगांवकरांनी जमवली होती. अशोक आणि निवेदिताच्या लव्हस्टोरीमध्ये अभिनेत्रीला सर्वाधिक मदत सचिन पिळगांवकरांनी केली होती. ‘अशी ही बनवाबनवी’च्या सेटवर त्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने फुललं.

याबद्दल सचिन पिळगांवकर तारांगणला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “सर्वात महत्त्वाची जोडी मी जमवली ती म्हणजे अशोक आणि निवेदिता. अशोक लग्नाला नाहीच म्हणत होता, लग्न वगैरे काही नकोय असं त्याचं म्हणणं होतं. त्याआधी त्याचा अपघात झाला होता, त्यामुळे तो अत्यंत त्रासात होता. त्याला दुखापत झाली होती…त्यातून तो हळुहळू सावरत होता. काम सुरू केल्यामुळे त्याला कामाच्या माध्यमातून एक वेगळं समाधान मिळत होतं. एकंदर काम करून तो खूश होता, कामात अतिशय व्यग्र होता. मग मी त्याची समजूत काढली होती. कारण, निवेदिताला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. बरं दुसऱ्या बाजूला निवेदिताची आई या लग्नाच्या अतिशय विरोधात होती. मग अशोक आणि मावशी या दोघांची समजूत काढत शेवटी २७ जून १९८९ मध्ये हे लग्न झालं.”

“सुरुवातीला मला या दोघांबद्दल अजिबात माहिती नव्हतं. सुप्रियाला माहिती होतं. आम्ही ‘कुणीतरी येणार गं’ या गाण्याच्या डान्सची रिहर्सल करत होतो. चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या तीन बायका रिहर्सल करत होत्या. एका बाजूला सुप्रिया, दुसऱ्या बाजूला निवेदिता आणि मध्ये मी. रिहर्सल करत असताना माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो. मी पडल्यावर निवेदिता धावत आली अशोक…अशोक काय झालं? म्हणत होती. मी आधी तिच्याकडे पाहिलं मग, सुप्रियाला पाहिलं. मी सुप्रियाला डोळ्यांनी विचारलं काय सुरूये…तर सुप्रियाने सुद्धा होकारार्थी मान हलवली. तेव्हा मला समजलं की, असं काहीतरी घडतंय. अशा अनेक आठवणी ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाच्या आहेत.” असं सचिन पिळगांवकरांनी नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या सहजीवनाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकताच अभिनेत्रीचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तर, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.