Ashok Saraf : महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतंच मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. साधारण महिन्याभरापूर्वी त्यांची ‘अशोक मा.मा.’ ही नवीन मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदीसह मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण, आता या मालिकेच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवत आहेत.

अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे ‘अशोक मामा’ ( Ashok Saraf ) या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासह या मालिकेत रसिका वाखरकर, शुभवी गुप्ते यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. टेलिव्हिजनवर केलेल्या कमबॅकबद्दल अशोक सराफ नुकतेच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाले आहेत. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…

हेही वाचा : Video: लोकलने प्रवास करणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? सीरिज नेटफ्लिक्सवर आहे ट्रेंडिंग

मालिकाविश्वातील कमबॅकबद्दल अशोक सराफ काय म्हणाले?

मालिकेसाठी रोजचे जवळपास १२ ते १४ तास द्यावे लागतात, त्यामुळे तुम्ही टेलिव्हिजनवर परतण्याचा निर्णय केव्हा घेतला? हा प्रश्न विचारताच अशोक सराफ म्हणाले, “खरं सांगायचं तर, मी मालिका करणार नव्हतो. मालिका, डेलिसोपमध्ये काही वेगळं करता नाही. आपण पाठ केलेलं बोलतो मग, कट… अशा पद्धतीचं स्वरुप असतं कारण, डेलीसोप असल्याने त्यांनाही एपिसोड पटकन शूट करायचे असतात. पण, माझं तसं नाहीये… प्रत्येक गोष्टीचा विचार करून मी कृती करतो. एखादा लूक, सीन त्यामागचा विचार समजून घ्यायचा असतो. म्हणून मी मालिका करत नव्हतो पण, सर्वांनी आग्रह केला आणि मी तयार झालो.”

“घरातून जास्त आग्रह धरला, विशेष म्हणजे निवेदिता म्हणाली…करा मालिका, मग मी तयार झालो, तिने पाठिंबा दिला. मालिकेसाठी मी नाटक सुद्धा जरा लांबणीवर टाकलंय. कारण, एकाच वेळी दोन गोष्टी करण्यात अर्थ नाहीये. त्यामुळे थोडे दिवस मी नाटक थांबवलंय. मालिका संपली की पुन्हा एकदा नाटकाकडे वळणार” असं यावेळी अशोक सराफ ( Ashok Saraf ) यांनी सांगितलं.

हेही वाचा : निक्की-अरबाजने ‘ते’ वचन पाळलंच नाही! छोटा पुढारी घन:श्यामची जाहीर नाराजी; नेटकरी म्हणाले, “दोघांनी फक्त तुझा वापर…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ची ‘अशोक मा.मा.’ ( Ashok Saraf ) ही नवीन मालिका २५ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, दररोज रात्री ८.३० वाजता ही मालिका घराघरांत प्रसारित केली जाते.