छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय विनोदी मालिका आहे. ही मालिका मागील १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. इतकी वर्षे उलटूनही मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मागील एका महिन्यापासून ही मालिका टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत भूताचा ट्रॅक दाखवण्यात आला होता. हा ट्रॅक प्रेक्षकांना फार आवडला आणि मालिकेने टीआरपीच्या बाबतीत इतर अनेक मालिकांना मागे टाकलं आणि पहिल्या क्रमांकावर बाजी मारली. सध्या निर्माते दिलीप जोशी साकारत असलेल्या जेठालाल गडा या पात्रावर लक्ष केंद्रित करत आहेत. याच दरम्यान प्रेक्षकांना दयाबेनच्या पात्राची आठवण झाली आहे. प्रेक्षक निर्मात्यांना सातत्याने विचारत आहेत की दिशा वकानी मालिकेत कधी परतणार?
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दयाबेनच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे. तसेच मालिका पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दयाबेन परतण्याबद्दल असित मोदी काय म्हणाले?
“दयाबेन मालिकेत कधी परतणार याबद्दल प्रेक्षक सतत विचारत असतात. दिशाजींनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. त्यांनी मालिका सोडून ८ वर्षे झाली आहे. इतक्या वर्षांनंतरही लोक त्यांची आठवण काढतात. त्यांनी साकारलेले पात्र अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे, इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी ती भूमिका साकारली होती,” असं असित मोदी म्हणाले.
“दिशाजींना परत आणणं सोपं नाही, त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीची आवश्यकता आहे. मी सध्या मालिकेच्या कथाकथनावर लक्ष केंद्रित करत आहे. जेव्हा कथा मजबूत असते तेव्हा लोक आपोआप कथानकाशी जोडले जातात. एखाद्या पात्राची अनुपस्थिती फारशी जाणवत नाही. हा शो नेहमीच त्याच्या कथेमुळे टिकून राहिला आहे. जोपर्यंत आम्ही मनोरंजक कंटेंट देत आहोत, तोपर्यंत काही पात्रे मालिकेत असोत किंवा नसोत, लोक जोडलेले राहतात,” असं असित मोदी यांनी नमूद केलं.
टीआरपी यादीत मालिका पहिल्या क्रमांकावर, असित मोदी म्हणाले…
“आम्ही खूप आनंदी आहोत की डेली सोप्सच्या दरम्यान हा शो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. या शोमध्ये सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यातील हलकी-फुलकी परिस्थिती दाखवण्यात येते, त्यामुळे लोक शोबरोबर कनेक्ट करतात. बऱ्याच वर्षापासून आमचं प्रेक्षकांची मजबूत कनेक्शन राहिलं आहे,” असं असित मोदी म्हणाले.