‘ब्रिटन गॉट टॅलेंट २०२५’ मध्ये एका भारतीय मुलीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बिनिता छेत्री असं या मुलीचं नाव आहे. मूळची आसामची असलेल्या बिनिता छेत्रीने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जागतिक व्यासपीठावर भारताला अभिमान वाटावा अशा कामगिरीबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनीही नऊ वर्षांच्या बिनिताचं कौतुक व अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर बिनिताचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती ‘ब्रिटनच्या गॉट टॅलेंट’च्या अंतिम फेरीत तिच्या इतर सह-स्पर्धकांबरोबर उभी असल्याचं दिसून येत आहे. “ब्रिटन गॉट टॅलेंटच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवल्याबद्दल आमच्या बिनिता छेत्रीचे खूप खूप अभिनंदन. तिच्या परफॉर्मन्सने ब्रह्मपुत्रापासून ते थेम्सपर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे आणि आम्हा सर्वांना तिचा अभिमान वाटतो,” असं कॅप्शन त्यांनी दिलं.

पाहा व्हिडीओ –

व्हायरल क्लिप बिनिता सेकंड रनर-अप असल्याची घोषणा होते. तिने या आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोमध्ये तिसरे स्थान पटकावले. अँकरने अनुभवाबद्दल विचारल्यावर बिनिता म्हणाली, “मला खूप आनंद होतोय आणि स्वतःचा अभिमान वाटतोय, हा सर्वोत्तम अनुभव आहे.” यानंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिला दाद दिली.

अंतिम फेरी ३१ मे रोजी यूकेमध्ये झाली. विजेत्याला २५०,००० पौंड रोख बक्षीस आणि २०२५ च्या शेवटी रॉयल व्हरायटी परफॉर्मन्समध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली. ब्रिटिश जादूगार हॅरी मोल्डिंगने ही स्पर्धा जिंकली, तर दुसऱ्या स्थानावर एलईडी डान्स ग्रुप ‘द ब्लॅकआउट्स’ राहिला.

आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील बोकाजन येथील बिनिता ही जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी भारतातील पहिली स्पर्धक ठरली. तिच्या ऑडिशन दरम्यान, तिने सांगितलं होतं की ही स्पर्धा जिंकून तिला ‘पिंक प्रिन्सेस हाऊस’ खरेदी करायचे आहे. बिनिताचे वडील अमर छेत्री हे बोकाजन येथील ब्रॉयलर फार्मचे मालक आहेत. त्यांनी बिनिताच्या या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. ते ऑल आसाम गोरखा स्टुडंट्स युनियनचे (AAGSU) कार्यकारी सदस्य आणि जिल्हा उपाध्यक्ष आहेत. नऊ वर्षांच्या बिनिताचे डान्स ट्रेनिंग आधी गुवाहाटी नंतर जयपूरमध्ये झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिनिताने आसामच्या मुख्यमंत्र्यांचे पाठिंबा व आशीर्वादांसाठी आभार मानले. ती म्हणाली, “मला गुवाहाटीला मुख्यमंत्री हिमंता मामा यांना वैयक्तिकरित्या भेटायचं आहे आणि माझ्या प्रवासात त्यांनी दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आणि आशीर्वादांबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत. मला आशा आहे की हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि मला त्यांना भेटण्याची संधी मिळेल.”