मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार, गायक, दिग्दर्शक म्हणून अवधुत गुप्तेला ओळखलं जातं. याशिवाय गेल्या काही वर्षांत अवधुत हा रिअ‍ॅलिटी शोचा परीक्षक म्हणून देखील नावारुपाला आला. त्याने स्पर्धकांना दिलेलं प्रोत्साहन, त्याच्या शो दरम्यानच्या उत्साह वाढवणाऱ्या कमेंट्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना आवडतात. नुकत्याच ‘मित्रम्हणे’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अवधुतला रिअ‍ॅलिटी शोबाबत विचारण्यात आलं. यावेळी गायकाने अनेक गोष्टींवर आपलं मत मांडलं.

अनेक गायक, कलाकार यापूर्वी रिअ‍ॅलिटी शोमुळे नावारुपाला आले. परंतु, अलीकडच्या काळात जे रिअ‍ॅलिटी शो झाले त्यातील स्पर्धक पुढे विस्मरणात जातात याविषयी सांगताना अवधुत म्हणाला, “यामध्ये दोन बाजू आहेत…मी ओव्हरऑल रिअ‍ॅलिटी शोबद्दल माझं मत सांगतो. एखाद्या गायकाला जेव्हा एखादा रिअ‍ॅलिटी शो मिळतो आणि तो गायक संबंधित शो जिंकतो. तेव्हा त्या स्पर्धकासाठी तो एक शॉर्टकट असतो. उदाहरणार्थ ५ किलोमीटरचा रस्ता स्पर्धकासाठी १ किलोमीटरपर्यंत येतो. पण, आपण एखाद्याच्या नशिबात बदल करू शकत नाही. ज्याच्या सौभाग्यात जे असतं ते मिळतं.”

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, शेअर केले खास फोटो

अवधुत पुढे म्हणाला, “याची आणखी एक बाजू पाहायला गेलं तर, सुनिधी चौहान, अरिजित सिंह, स्वप्नील बांदोडकर ते अवधुत गुप्तेपर्यंत ही माणसं जर रिअ‍ॅलिटी शोमध्ये गेली नसती, तर त्यांना यश मिळवता आलं असतं का? तर, शंभर टक्के आम्हाला यश मिळालं असतं. कदाचित कालावधी तुलनेने जास्त लागला असता. पण, यश जरुर मिळालं असतं.”

हेही वाचा : “तिसरं लग्न कधी करणार?”, कपिल शर्माच्या प्रश्नावर आमिर खानने काय दिलं उत्तर?

“‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये जे-जे गायक आले त्यातले खूप पुढे गेले. काहींना नाही शक्य झालं. पण, या सगळ्यात त्या मंचाचा, एकविरा प्रोडक्शनचा, कलर्स मराठीचा पाच टक्के सहभाग आहे. रिअ‍ॅलिटी शोमुळे फक्त करिअरचा प्रवास तुलनेने सोपा होतो. पण, आम्ही त्यांचं करिअर घडवलंय हा क्लेम कोणीही करू शकत नाही. ज्याच्या सौभाग्यात जे आहे तेच मिळतं. याशिवाय मी अनेक स्पर्धकांना शोनंतर सुद्धा पाठिंबा दिला आहे. एक चांगला गायक आणि एक चांगला प्लेबॅक गायक या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आम्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये फक्त एक चांगला गायक शोधून काढतो. पण शोनंतर संबंधित स्पर्धकाला व्यावसायिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी बाहेरील जगात आणखी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. कॉन्सर्ट, पैसे, सामाजिक भान, आलेले पैसे कुठे लावायचे, संघर्ष अशा सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. अशाप्रकारे चांगला गायक होण्याबरोबरच या व्यावसायिक गोष्टी समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे.” असं स्पष्ट मत अवधुत गुप्तेने मांडलं.