Avinash Narkar Shared Childhood Memory : लहानपण हे प्रत्येकासाठी खास असतं. या लहानपणी आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या मुभा असतात. पण त्यासाठी आई-वडिलांची परवानगी मिळणंही तितकंच गरजेचं असतं. त्यात आई-वडील जर कडक शिस्तीचे असतील, तर मग मुलंदेखील वेगवेगळ्या शक्कल लढवत त्यांच्याकडून परवानगी घेत असत. लहानपणी अश्या अनेक शक्कल लढवत प्रत्येकानेच आई-वडिलांकडून कोणत्या ना कोणत्या कामासाठी परवानगी मिळवलीच असेल. असंच काहीसं अविनाश नारकर यांनीही त्यांच्या लहानपणी केलं होतं.

अभिनेते अविनाश नारकर हे गेले अनेक वर्ष मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अविनाश नारकर कायमच त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने आणि बोलण्याने समोरच्याला आपलंस करतात. सोशल मीडियावरही ते बरेच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ किंवा डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे.

अविनाश नारकरांनी नुकतीच आरपारला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लहानपणी आईकडून परवानगी कशी घ्यायचे? याबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. याविषयी ते असं म्हणाले की, “आम्ही चाळीत राहायचो आणि तेव्हा आमची आई तंबाखूची मशेरी लावायची. तर मी हे हेरून ठेवलं होतं की ज्यावेळेस आई मशेरी घेऊन बसेल त्यावेळी आईला काहीतरी मागायचं किंवा कबूल करायचं. कारण आई मशेरी लावायची तेव्हा तंद्रीत असायची.”

यापुढे त म्हणाले की, “आई मशेरी लावताना मी तिला ‘राम और शाम’ चित्रपट आहे तर जाऊ का? असं विचारायचो. तर आई सुरुवातीला नाही म्हणायची. मग मी तिला जाऊदे म्हणून हट्ट करायचो. त्यावर ती बाबा ओरडतात मला असं म्हणायची. मग मी पुन्हा लता आणि साधनाला घेऊन जातो असं म्हणायचो. मग ती लवकर ये. उशीर उशीर नको. कडी वाजवू नको असं सांगायची.” दरम्यान, हा मजेशीर किस्सा सांगताना अविनाश यांनी त्यांच्या आईची हुबेहूब नक्कलही केली.

अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, १९९४ साली ‘मुक्ता’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ते अनेक गाजलेल्या नाटक व चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सर्व भूमिकांनाही चांगलाच प्रतिसाद दिला. सध्या ते स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत काव्या आणि नंदिनीच्या सासऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर रंगभूमीवर त्यांचं ‘पुरुष’ हे नाटकही सुरू आहे.