‘बिग बॉस 16’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. येत्या काळात या घरातील ड्रामा आणखी वाढेल, असं दिसतंय. काही दिवसांपूर्वी शोमध्ये अर्चना आणि शिव ठाकरेचं जोरदार भांडण झालं होतं. त्या भांडणात अर्चनाने शिवचा गळा दाबला होता, त्यानंतर अर्चनाला घराबाहेर काढण्यात आलं होतं. पण नंतर अर्चना शोमध्ये परतल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण झाल्याचं कळतंय. यावेळी हे भांडण घरातल्या शांत सदस्यांपैकी एक असलेल्या रॅपर एमसी स्टॅन आणि शालीन भानोत याच्यादरम्यान झालंय.

शालिन भानोत आणि एमसी स्टॅन यांच्यात जोरदार भांडण झालं आणि त्यानंतर एमसी शालिनला मारण्यासाठी फुलदाणी घेऊन त्याच्या मागे धावल्याचं कळतंय. टीनाच्या पायाला दुखापत झाली होती आणि शालिन मालिश करून देत होता, पण एमसीने शालिनला रोखलं. यानंतर शालिनने एमसीला मधे न बोलण्यास सांगितलं. त्यावरून एमसी आणि शालिनमध्ये जोरदार भांडण झालं आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं.

कलर्स टीव्हीने या भांडणाचा एक प्रोमो शेअर केला आहे. तसेच शोबद्दल अपडेट देणाऱ्या बिग बॉस तक नावाच्या ट्विटर हँडलवरून या भांडणाची माहिती देण्यात आली आहे. ‘टीना घसरून पडली व तिच्या पायाला दुखापत झाली. शालिनने तिची काळजी घेत होता आणि तिच्या पायाला मालिश करत होता. याचदरम्यान टीना किंचाळली, त्यामुळे एमसी स्टॅनने शालिन तिच्या पायाची मालिश करू नकोस, असं सांगितलं. पण शालिन मात्र टीनाचे पाय दाबत राहिला. त्यानंतर स्टॅनने शालिनला शिवीगाळ केली. पुढे शालिनने स्टॅनच्या आईबद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे चिडलेला स्टॅन फुलदाणी घेऊन शालिनला मारायला धावला.

घरातील इतर स्पर्धक शिव ठाकरे, साजिद खान, निमृत कौर अहलुवालिया आणि सुंबूल तौकीर खान यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली, असं समोर आलंय. दरम्यान, ‘विकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खान या भांडणावर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.