Bigg Boss 18 Fame Actress Fraud Allegations By Designer : मालिका, सिनेमा किंवा रिअॅलिटी शोमधून कलाकारांना एकदा प्रसिद्धी मिळाली की, त्यांना मोठमोठ्या ब्रँड्सकडून जाहिरात, प्रसिद्धी आणि ब्रँडिंगसाठी सोशल मीडियावर विचारणा होते. कलाकारांच्या प्रसिद्धीचा या ब्रँड्स किंवा कंपन्यांना फायदाच होत असतो. मात्र यात कधीकधी ब्रँड्सची फसवणूकसुद्धा होते. असाच फसवणुकीचा आरोप एका अभिनेत्रीवर करण्यात आला आहे.
हिंदी ‘बिग बॉस १८’मधून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्रीला एका कंपनीने ड्रेस दिला होता, मात्र हा ड्रेस परत करताना अभिनेत्रीने नुकसान केल्याचं त्या ड्रेसच्या डिझायनरने म्हटलं आहे. तसंच या ड्रेसच्या नुकसानाबद्दल अभिनेत्रीकडून माफी किंवा नुकसान भरपाईसुद्धा देण्यात आली नसल्याचं डिझायनरने सांगितलं आहे. याबद्दल डिझायनरने थेट सोशल मीडियावर पुरावेच सादर केले आहेत.
‘बिग बॉस १८’ची स्पर्धक कशिश कपूरवर एका डिझायनरने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. डिझायनरच्या मते, कशिशने तिच्याकडून तब्बल ८५,००० रुपयांचा खास ड्रेस घेतला होता, जो परत करताना ओला, मळकट आणि खराब अवस्थेत दिला गेला. त्यामुळे आता तो ड्रेस विकताही येत नाहीय आणि त्याचा वापरही करता येत नसल्याचं डिझायनरने सांगितलं आहे.
याप्रकरणी पुरावा म्हणून डिझायनरने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्सदेखील शेअर केले. त्याचबरोबर कशिशकडून भरपाई नाकारण्यात आली असून अभिनेत्रीने त्यांना ब्लॉक केल्याचा दावाही डिझायनरने केला आहे. स्मिता श्रीनिवास यांच्या मालकीच्या ब्रँडने सोशल मीडियावर यासंबंधीचे स्क्रीनशॉट शेअर करत कशिशवर आरोप केलाय की, ड्रेससाठी भरपाई मागितल्यानंतर फक्त ४०,००० रुपये देण्यात आले, जी ड्रेसच्या मूळ किंमतीच्या निम्म्याहूनही कमी आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, कशिशने भरपाईचे पैसे देण्यास नकार दिला आणि सांगितलं की, तिने तो ड्रेस कधी घातलाच नाही. डिझायनरने यावर नाराजी व्यक्त करत सांगितलं की, याबद्दल तिची माफी ना मागण्यात आली, ना तिला याचे पैसे मिळाले. अखेर तिच्याशी संपर्कही बंद करण्यात आला.
दरम्यान, या वाईट अनुभवानंतर डिझायनरने इतरांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी सर्व व्यवहारांची नोंद ठेवा, आगाऊ रक्कम घ्या आणि ‘प्रसिद्धी मिळेल’ या आमिषाला बळी पडू नका असं म्हटलं आहे.