Abhishek Bajaj on Pranit More: ‘बिग बॉस १९’ या रिअॅलिटी शोमध्ये सध्या अनेक गोष्टी घडत असल्याचे दिसत आहे. या खेळात दिवसागणिक गोष्टी बदलताना दिसतात.
कधी मित्रच मित्राचा विश्वासघात करतो, तर कधी शत्रू मित्र होतात. कधी कोण दुखावते, तर कधी कोणी खळखळून हसवते. अनेकदा एखाद्या स्पर्धकाला कठीण निर्णय घ्यावे लागतात.
गेल्या आठवड्यात असेच काहीसे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले. अभिषेक बजाज, अशनूर कौर, नीलम गिरी, गौरव खन्ना, फरहाना भट्ट हे पाच सदस्य घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. वीकेंड का वार या आठवड्याच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गौरव व फरहाना हे सुरक्षित असल्याचे सलमान खानने सांगितले.
त्यानंतर अभिषेक बजाज, अशनूर कौर, नीलम गिरी हे तीन स्पर्धक उरले होते. त्यापैकी एकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यापासून वाचवण्याची पॉवर प्रणितला दिली होती. त्यापैकी प्रणितने अशनूरला वाचवले. त्यामुळे अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांना घराबाहेर पडावे लागले.
प्रणित मोरेबद्दल अभिषेक बजाज म्हणाला…
आता ‘बिग बॉस १९’मधून बाहेर पडल्यानंतर अभिषेक बजाजने प्रणित मोरेच्या निर्णयावर त्याचे मत मांडले आहे. अभिषेक बजाजने नुकताच ‘टेली टॉक इंडिया’ बरोबर संवाद साधला. तो म्हणाला, “मला या गोष्टीचे जास्त दु:ख होते की, मी आणि अशनूर यापैकी कोणाला तरी एकाला बाहेर जावे लागणार आहे. जेव्हा मला माहीत झाले की, प्रणितला एकाला वाचवायचे आहे आणि कोणते तरी दोन स्पर्धक घराबाहेर पडणार आहेत, त्यावेळी मी भावूक झालो होतो. प्रणितने जरी एकाला वाचवले तरी आमच्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला बाहेर पडावेच लागणार होते. आमची जोडी त्यांनी तोडली.”
अभिषेक पुढे म्हणाला, “प्रणित मला नेहमी असे म्हणत असे की, तू माझ्या सर्वांत जवळचा आहेस. तू प्राधान्यक्रमात पहिला आहेस. मी त्याला हेच सांगत असे की, माझ्या प्राधान्यक्रमात अशनूर पहिल्यांदा आहे, तू दुसरा आहेस. मला वाटते की, तो निर्णय ज्यावेळी त्याला घ्यायचा होता, त्यावेळी त्यानं खेळाचा विचार केला. आम्ही नाती जपली आणि तो हुशारीनं खेळला.”
दरम्यान, प्रणित मोरेच्या निर्णयानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. बिग बॉसच्या खेळात अशनूरपेक्षा अभिषेक बजाजचे जास्त योगदान होते, अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
