Bigg Boss 19 Basir Ali : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त तरी तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. अशातच काही दिवसांपासून ‘बिग बॉस’च्या नव्या म्हणजेच १९ व्या पर्वाची चर्चा सुरू होती. अखेरीस रविवारी (२४ ऑगस्ट) हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
नेहमीप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना या शोमध्ये सहभागी होणारे नवीन चेहरे कोण असणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. अनेक टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया ईन्फ्लूएन्सर्सची नावे यात होती. त्यापैकी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करणारा पहिला स्पर्धक होता बसीर अली.
बसीरने याआधी अनेक रिअॅलिटी शोमधून स्वत:ची अशी एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यामुळे याआधी अनेक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला बसीर ‘बिग बॉस १९’मध्येही त्याची एक वेगळी जागा निर्माण करू शकेला का, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया, हा बसीर अली कोण आहे?
बसीर अली हा २९ वर्षीय मॉडेल, अभिनेता व टीव्ही सेलिब्रिटी आहे. तो हैदराबादचा रहिवासी असून २०१७ मध्ये ‘MTV रोडीज रायझिंग’ हा शो जिंकल्यानंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याच वर्षी त्यानं ‘स्प्लिट्सव्हिला’ सीझन १० देखील जिंकला. त्या शोमध्ये त्याची जोडी नैना सिंगबरोबर होती आणि त्यांनी एकत्रितपणे विजेतेपद मिळवलं.
रिअॅलिटी शोमधून नाव कमावल्यानंतर बसीरनं अभिनयाकडे मोर्चा वळवला. त्यानं झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’मध्ये शौर्य लुथरा ही भूमिका साकारली होती. या मालिकेची एकता कपूरने निर्मिती केली असून, त्यामध्ये श्रद्धा आर्य, मानित जोरा व धीरज धूपर यांसारख्या कलाकारांबरोबर बसीरनं काम केलं आहे.
आता बसीर ‘बिग बॉस १९’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सव्हिला’ यांसारख्या शोमधील अनुभवाच्या जोरावर तो या सीझनमध्ये त्याची एक वेगळी रणनीती बनवून, मनोरंजनही करू शकतो का? याबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात अशनूर कौर, झीशान कादरी, तान्या मित्तल, अवेज दरबाज, नगमा मिराजकर, नेहल चुडासामा, अभिषेक बजाज, बसीर अली, गौरव खन्ना, नतालिया जानोस्झेक, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, नीलम गिरी, मृदुल तिवारी, अमाल मलिक, जीशान कादरी आणि कुनिका सदानंद हे स्पर्धक सहभागी झाले आहेत.