Amal Malik Shares Anu Malik treatment with his father : Bigg Boss 19 चा स्पर्धक आणि संगीतकार-गायक अमाल मलिकचं आजपर्यंतचं कौटुंबिक नातं आणि त्यांचा संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. इतकंच नव्हे, तर शोदरम्यान अमालने अनेक वेळा असा दावा केला आहे की, अनू मलिक यांनी त्याच्या वडिलांचं करिअर उध्वस्त केलं आणि त्यांना यशस्वी होऊ दिलं नाही.

अशातच नुकत्याच एका भागात, बसीर अलीबरोबरच्या संवादात त्याने याबद्दलची जुनी आठवण शेअर केली. अमालने या विषयाची सुरुवात अनू मलिकचं कौतुक करत केली. त्याने सांगितलं की, त्याचे आजोबा सरदार मलिक यांनी सुरू केलेला संगीताचा वारसा, त्याच्या काकांनी म्हणजेच अनू मलिक यांनी पुढे नेला. मात्र, त्यानंतर अमालने स्पष्ट केलं की, त्याला सर्वात जास्त दु:ख झालं ते काकांनी वडिलांशी केलेल्या वागणुकीमुळे.

अमालने सांगितलं की, एकदा त्याने स्वतःच्या वडिलांना पूर्णपणे खचलेलं पाहिलं, कारण त्यांचं एक गाणं त्यांच्या नकळत वापरण्यात आलं होतं – तेही कोणतंही श्रेय न देता. अमाल म्हणाला, “मी वडिलांना फारच असहाय्य अवस्थेत पाहिलं होतं. ते अनेक वर्ष काकाला (अनू मलिक) काही बोलले नाहीत. एक दिवस त्यांना एका गाण्याचं रेकॉर्डिंग करायला स्टुडिओमध्ये बोलावलं. काही दिवसांनी वडील यारी रोडच्या एका म्युझिक शॉपमध्ये गेले, तिथे त्याच गाणं सुरू होतं. पण आवाज होता; उदित नारायण यांचा.”

अमालने पुढे सांगितलं की, “वडिलांनी जेव्हा त्या दुकानाच्या मालकाला विचारलं, तेव्हा कळलं की, ते गाणं तीन वर्षांपूर्वीच्या एका चित्रपटातलं आहे. म्हणजेच, अनू मलिक यांनी वडिलांना केवळ एक फेक रेकॉर्डिंगसाठी बोलावलं होतं. त्यांनी जुनं गाणं घेतलं, उदित नारायणच्या आवाजात ते पुन्हा रेकॉर्ड केलं आणि वडिलांना असं वाटलं की, त्यांना संधी दिली जात आहे.”

बसीरने जेव्हा विचारलं की, ‘काकांनी असं का केलं, यामागचं कारण काय होतं?’ तेव्हा अमालने थेट उत्तर दिलं की, “तो माणूस खूप स्वार्थी आहे. वडिलांना जो धोका मिळाला त्यातून ते कधी सावरूच शकले नाहीत.”

अमालने पुढे असंही म्हटलं की, “आम्ही १४ ते १७ वर्षांचे असताना, आमच्यात खूप प्रेम होतं. पण त्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला आणि यामागे माझी काकू कारणीभूत आहे. काही घरांत ‘बायका’ मोठं संकट असतात. वडिलांनी आम्हाला नेहमी सांगितलं की, एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करा आणि आज आम्ही जिथे आहोत, त्याचं श्रेय आई-वडिलांना जातं. माझ्या वडिलांसारखा दिलदार माणूस आजही कोणी नाही.”