Pranit More Talks About His Relationship : प्रणित मोरे ‘बिग बॉस १९’मधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. तो नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता प्रणित त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
प्रणित मोरे हा पेशाने स्टँडअप कॉमेडियन आहे. तो ‘बिग बॉस’च्या घरातही अनेकदा त्याच्या विनोदीशैलीने अनेकांचं मनोरंजन करताना दिसतो. ‘बिग बॉस’च्या घरातील त्याच्या विनोद करतानाच्या क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर सध्या त्याला घरामध्ये मालती चहरच्या नावाने इतर स्पर्धक चिडवताना दिसतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, प्रणित मोरेने पहिल्यांदाच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉसच्या’ घरात रविवारी सेलिब्रिटी ज्योतिषी Jai Madaan यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रणितने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे. यावेळी सेलिब्रिटी ज्योतिषींनी घरातील काही स्पर्धकांच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला तर काहींना त्यांच्या भविष्यात काय घडणार आहे याची भविष्यवाणी सांगितली. यावेळी त्यांनी प्रणित मोरेशीही संवाद साधला. त्यांनी प्रणितचं यावेळी कौतुकही केलं.
प्रणित मोरेची रिलेशनशिपबद्दल प्रतिक्रिया
प्रणित मोरेला तू शेवटचं रिलेशनशिपमध्ये कधी होतास असं विचारलं. यावर प्रणितने “दोन अडीच वर्षांपूर्वी” असं उत्तर दिलं. यावर सेलिब्रिटी ज्योतिषी म्हणाल्या, “तुला वाटतं का की त्याकडे जरा लक्ष द्यायला हवं”. पुढे त्या म्हणाल्या, “तुला असं वाटतं की कोणी तुझ्यावर का प्रेम करेल, असं नाही वाटलं पाहिजे; कारण तू खूप प्रेमळ, खूप भावनिक आणि एक पुरुष म्हणून खूप जबाबदार आहेस आणि हे गुण मुलींना लवकर कळतात आणि मुलगी जितकी सुंदर असते ना तितकं तिला सर्वसामान्य मुलं आवडतात.” हे सगळं ऐकून प्रणित आनंदी होत हसताना दिसला.
‘बिग बॉस’च्या घरात सध्या मालती व प्रणित यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाल्याचं पाहायला मिळतं. हे दोघे अनेकदा एकमेकांबद्दल विविध विषयांवर गप्पा मारताना दिसतात, तर अनेकदा एकमेकांची बाजू घेत पाठिंबाही देतात, त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवलं जातं. तसेच सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक रील व्हायरल होत असतात. परंतु, दोघेही नेहमी त्यांच्यामध्ये फक्त मैत्री असल्याचं सांगतात.
